बदलापूर : शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील खर्डी, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील काही भागात दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. दुपारी अडीचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. काही भागात गाराही पडल्याची माहिती खर्डी येथील स्थानिकांनी दिली आहे. तर मुरबाडच्या घाट परिसरात काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. दुपारपर्यंत जिल्ह्यात इतर भागात मात्र पाऊस नव्हता.

राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यानुसार काही भागात गुरूवारीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अंबरनाथ, बदलापूर शहरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. मात्र त्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्याची नोंद झाली नाही.

मात्र त्याचवेळी शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस कोसळला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शहापूर, खर्डी भागात पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळपासून या भागात ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. तर मुरबाड तालुक्यातील घाटाच्या खालच्या भागातही अशाच सरी कोसळल्या. अंबरनाथ आणि बदलापूर तसेच उल्हासनगर भागात दुपारी तीन वाजेपर्यंत पाऊस पडला नव्हता.

पूर्व मोसमी पाऊस किंवा वळवाचा पाऊस हा एप्रिल किंवा मे महिन्यात कोसळतोच अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. त्यानुसार आम्ही दोन ते पाच मे दरम्यान अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार घाट आणि घाटाखाली पाऊस कोसळला. आणखी एक दिवस पावसासदृश परिस्थिती राहू शकते अशीही माहिती मोडक यांनी दिली.

पुढील आणखी एक दिवस पावसाची शक्यता आहे. पण त्यानंतर पुन्हा वातावरण साधारण होईल, असेही मोडक यांनी सांगितले आहे. घाटावरच्या भागात पावसाचा अंदाज अधिक आहे. अंतर्गत भागात पावसाची आजही शक्यता आहे, मात्र लहानसे धुळीचे वादळ येऊ शकते, असेही मोडक लोकसत्ताशी बोलताना म्हणाले.

विद्यार्थ्यांची तारांबळ

सध्या विविध इयत्तांच्या शाळा, महाविद्यालयीन परिक्षा सुरू आहे. शहापूर आणि मुरबाड तालुक्यात शुक्रवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली. अनेक विद्यार्थ्यांनी छत्री किंवा पावसापासून वाचण्याचे साहित्य न नेल्याने त्यांची फजिती झाली. येत्या दोन दिवसात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पावसामुळे नागरिकांची कडाक्याच्या उन्हापासून सुटका झाली आहे. मात्र आणखी एक किंवा दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.