लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे, कल्याण : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि ठाणे ग्रामीण भागात रविवारी पहाटे आणि रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. शहापूर तालुक्यातील काही भागात गारांचा पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. काही भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. पावसामुळे रात्री वाहनांचा वेग मंदावून वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र होते. भिवंडीतील काल्हेर भागात एका इमारतीवर वीज पडून आग लागली. यात जीवितहानी टळल्याची माहिती भिवंडी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात रविवारी पहाटे आणि सायंकाळी पावसाने हजेरी लावली. ठाणे शहरात सायंकाळी ढग दाटून आले होते. त्यानंतर वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांना भिजत घरी जावे लागले. हवेत गारवा निर्माण झाला होता. रविवार असल्याने शहरात वाहनांची संख्या कमी होती. परंतु पावसामुळे वाहनांचा वेग मंदावून काही ठिकाणी कोंडी झाली होती. भिवंडी शहरातही पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. भिवंडीतील काल्हेर भागात रविवारी सकाळी सुमारे ७ वाजता काशीनाथ पार्क या इमारतीवर वीज पडून आग लागली. यात जीवितहानी टळल्याची माहिती भिवंडी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आणखी वाचा-कल्याण रेल्वे यार्डातील रिकाम्या बोगीला भीषण आग

कल्याण, डोंबिवली भागात पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे बाजारपेठा काही ओस पडल्या होत्या. रस्त्यावरील गर्दी ओसरली होती. सुट्टीचा दिवस म्हणून ग्रामीण भागात डोंगर दऱ्यात फिरायला गेलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण भागात शेतकऱ्यांची भात मळणीची कामे सुरू आहेत. अवकाळी पावसाने मळणी केलेल्या भाताचे नुकसान झाले. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेली. टेंभुर्णी गावात एका शेतकऱ्याचे घर कोसळले आहे. शहापूरमध्ये समर्थ नगर भागात एका रहिवाशाच्या घरावर झाड कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आदिवली भागात गारांचा पाऊस झाला, असे भागातील ग्रामस्थ वसंतकुमार पानसरे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rain in thane district hail in rural areas mrj
Show comments