तीन महिन्यांपूर्वीचा प्रसंग. उल्हासनगर परिसरात राहणारी १९ वर्षीय शीला (बदलेले नाव) घरातून अचानक बेपत्ता झाली. आई-बाबांनी तिची सर्वत्र शोधाशोध सुरू केली; पण तिचा शोध काही लागत नव्हता. शीलाने घराबाहेर जाताना कपडय़ांची बॅग सोबत नेली होती. घर सोडून जाण्यामागचे कारण आणि कुठे गेली, याचा थांगपत्ता लागत नव्हता. उल्हासनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद झाली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली खरी; पण त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते. याच परिसरात १९ वर्षीय राज (बदललेले नाव) राहत असून त्याच्यासोबत शीला पळून गेली, अशी माहिती तिच्या आई-बाबांना एकेदिवशी मिळाली. त्यांनी पोलिसांना तसे कळवताच तपास त्या दृष्टीने सुरू झाला, मात्र राजचा मोबाइल बंद होता. शीलाकडे मोबाइल फोन नव्हताच. यामुळे तपास पुढे सरकतच नव्हता. मुलीच्या काळजीने व्यथित झालेल्या शीलाच्या आई-बाबांनी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांची भेट घेतली आणि त्यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लक्ष्मीनारायण यांनी लगेचच ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला समांतर तपास करण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवल हायलिंगे यांनी तपासाला सुरुवात केली. या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आणि संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. त्यामध्ये त्यांना शीला राजसोबत पळून गेल्याची खात्री झाली आणि राजचा शोध सुरू केला. येथूनच खऱ्या अर्थाने तपासाची चक्रे फिरली. शीला आणि राज या दोघांच्या घरी चौकशी केली. तपासादरम्यान शीला घरी संपर्क साधणार, यावर त्यांचे ठाम मत झाले. यामुळे शीलाचा फोन किंवा काही पत्र आले, तर लगेचच माहिती द्या, असे हायलिंगे यांनी तिच्या आई-बाबांना सांगितले. दोन दिवसांनंतर शीलाने आईला फोन केला आणि सुखरूप असल्याचे सांगितले. राजसोबत लग्न केले असून त्याची कागदपत्रे पोस्टाने येतील, असेही तिने सांगितले. तसेच आता आम्ही दोघे पनवेलमध्ये असल्याचेही सांगितले. या फोनविषयी माहिती मिळताच पोलिसांनी त्या क्रमांकाचा शोध घेतला. मुंबई येथील वरळी भागातील एका पीसीओचा तो क्रमांक होता. तिने पनवेलमध्ये असल्याची थाप आईला मारली होती. उपनिरीक्षक हायलिंगे आणि त्यांचे पथक या प्रकरणात शांत डोक्याने काम करीत होते. यामुळे ते लग्नाची कागदपत्रे पोस्टाने येण्याची वाट पाहू लागले. दोन दिवसांनी कागदपत्रे येताच त्यांनी ती तपासली. कल्याण न्यायालयात त्यांच्या लग्नाची नोंदणी झाली असून ती कागदपत्रे एका यादव नावाच्या वकिलाने तयार केली आहेत, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्या हाती लागली. यामुळे त्यांनी त्या वकिलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. असे असतानाच त्यांना दुसऱ्या वकिलाकडे काम करणारा एक तरुण भेटला. राज १९ वर्षांचा असल्यामुळे आमच्या वकिलांनी नकार दिला होता. यामुळे अॅड. यादव याला आपण ते काम दिले होते, मात्र त्या कामाचे दोन हजार रुपये अद्याप मिळालेले नाहीत, अशी सविस्तर माहिती त्याने देताच हायलिंगे यांच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. पोलिसांनी आपली ओळख दाखवताच तो तरुण पोलिसांना मदत करण्यास तयार झाला. राजला फोन करून तातडीने पैसे घेऊन येण्याचा निरोप देण्यास त्याला सांगितले. त्यानुसार त्याने निरोप दिला; पण पैसे घेऊन राजचा एक मित्र आला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरू केली, मात्र आपल्या दुसऱ्या एका मित्राने हे पैसे पोहोचवण्यास या तरुणाने सांगितले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या दुसऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तो बोलू लागला. आपल्याला राज कुठे आहे, हे माहीत नाही, मात्र तो आपल्या आईच्या संपर्कात आहे, असे या तरुणाने सांगितले. हे समजताच पथकाने एक क्लृप्ती लढवली आणि राजसाठी सापळा रचला. लग्नाच्या सत्यप्रतींवर दोघांच्या महत्त्वाच्या स्वाक्षऱ्या राहिल्या असून त्या होताच पोलीस त्यांचे काहीच करू शकणार नाहीत, असा निरोप त्या तरुणामार्फत फोनवरून राजच्या आईकडे पाठवला.
राजप्रमाणेच त्याची आईसुद्धा सावधगिरी बाळगत होती. यामुळे लगेचच तिने हायलिंगे यांच्याशी संपर्क साधला. उल्हासनगर पोलीस त्रास देत असून राजला हजर करण्यासाठी सांगत आहेत, असे सांगत तिने हायलिंगे नेमके कुठे आहेत, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर तुम्ही त्याला हजर करा, असे सांगत त्यांनी आपण गोरेगावला पथकासोबत असल्याचे सांगितले. या फोनमुळे राज जाळ्यात अडकणार याचा अंदाज पथकाला आला. मग सापळा तयारच होता. या फोननंतर लगेचच तिने राजच्या मित्राला फोन करून कल्याण परिसरात भेटण्याची जागा ठरविली. त्यानुसार, पथकाने सापळा रचला. ठरलेल्या जागेवर शीला, राज, आणि त्याची आई आले आणि पोलिसांच्या जाळ्यात अलगदपणे सापडले. या दोघांनाही पथकाने स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून राजने खूपच सावधगिरी बाळगली. त्याच्या आईनेसुद्धा खूपच गोपनीयता ठेवली. आपल्याला राज कुठे आहे, याचा सुगावाही लागू दिला नाही; पण पोलिसांच्या कौशल्य आणि चातुर्यपूर्ण जाळ्यात ते फसले. राजचे वय १९ असतानाही त्याचे लग्न कसे झाले आणि त्या वकिलाने कशाच्या आधारे लग्नाची कागदपत्रे तयार केली, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे आले असून याची सविस्तर चौकशी स्थानिक पोलिसांनी करायला हवी आहे. कदाचित यातून काही निष्पन्न होणार नाही किंवा काही तरी वेगळेच प्रकरण समोर येऊ शकते.
नीलेश पानमंद
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा