ठाणे : भिवंडी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीवर जमीनीच्या वादातून गोळ्या झाडून फरार झालेल्या बाबर मुमताज अहमद मन्सुरी याला शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. मागील पाच वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये एक खूनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच उत्तरप्रदेशात गुंडा ॲक्ट नुसार त्याच्यावर कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

भिवंडी येथील शांतीनगर भागात राहणारे सत्तार मन्सुरी यांची उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील फुलपूर भागात शेत जमीन होती. या जमीनीवरुन सत्तार मन्सुरी याच्यासोबत त्याच्या गावाकडील नातेवाईकांनी वाद घातला होता. ऑगस्ट २०२० मध्ये रात्री १०.३० वाजता सत्तार मन्सुरी हे भिवंडी येथील गुलजारनगर परिसरात आले असताना, त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यात सत्तार मन्सुरी हे गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. परंतु बाबर मुमताज अहमद मन्सुरी याचा पोलिसांना शोध लागत नव्हता. दरम्यान, बाबर मुमताज अहमद मन्सुरी हा उत्तरप्रदेशात लपून असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे, अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, भिवंडी परिमंडळाचे पोलीस उपायुक्त डाॅ. मोहन दहीकर, साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे, पोलीस हवालदार रिझवान सैय्यद, पोलीस शिपाई प्रशांत बर्वे, पोलीस शिपाई रोशन जाधव यांना उत्तरप्रदेशातील फुलपूर येथे तपासासाठी रवाना केले. फुलपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, प्रयागराज येथील एस.टी.एफ. पथकाच्या मदतीने शांतीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बाबर मुमताज अहमद मन्सुरी याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बाबर मुमताज अहमद मन्सुरी हा उत्तरप्रदेशमधील गँगस्टर असून त्याच्याविरोधात उत्तरप्रदेश फुलपूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरोधात गुंडा ॲक्ट नुसार कारवाई देखील झाली होती. सुमारे पाच वर्षांनंतर पोलिसांनी बाबर मुमताज अहमद मन्सुरी याला अटक केल्यानंतर सर्वच स्तरातून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.