लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर: बदलापूरसह आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्त्वाच्या असलेल्या बदलापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे रूप लवकरच बदलणार असून ५० खाटांचे हे रुग्णालय आता २०० खाटांचे होणार आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. शस्त्रक्रिया विभागासह विविध आरोग्यांचे तज्ञ, रक्तपेढी यासह इतर अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्याचा लाखो नागरिकांना फायदा होणार आहे.

बदलापूर शहरात असलेले उपजिल्हा रुग्णालय बदलापूर शहरासह अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण रुग्णांसाठी उपयोगी आहे. बदलापूर शहरातील अनेक रुग्ण येथे येत असतात सात वर्षांपूर्वी २०१७ या वर्षात या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला होता. त्यावेळी खाटांची संख्या ५० करण्यात आली होती. आता शासनाच्या आरोग्य विभागाने या रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता येथील खाटांची संख्या २०० होणार आहे. येथील प्रसूती विभाग, सामान्य रुग्ण विभाग यातील खाटांची संख्याही यामुळे वाढणार आहे. सोबतच अतिदक्षता विभागाची ही सुरुवात या रुग्णालयात होणार आहे.

आणखी वाचा-एमएमआर क्षेत्रातील पर्यटन विकासासाठी ‘सप्तसूत्री’

यापूर्वी शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात रुग्ण दाखल करण्यासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात जावे लागत होते. येथे खाटा पूर्ण क्षमतेने भरलेले असल्यास कळवा किंवा मुंबईला रुग्णाला स्थलांतरित करावे लागत होते. मात्र आता बदलापुरातच ही सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्याचा रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. सोबतच स्त्री रोग तज्ञ, बालरोगतज्ञ यांच्यासह विविध आजारांचे तज्ञ बदलापूरच्या रुग्णालयात सुरु होणार आहे. यापूर्वी या सर्व सुविधा मिळवण्यासाठी उल्हासनगर ठाणे किंवा मुंबई मध्ये जावे लागत होते.

शस्त्रक्रिया विभागही सुरू होणार

उपजिल्हा रुग्णालयाचे सामान्य रुग्णालयात रूपांतर झाल्यानंतर या रुग्णालयात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शस्त्रक्रिया विभाग अद्ययावत होणार आहे.

आणखी वाचा-Ovala Majiwada Sabha Constituency : उच्चभ्रू वस्तीच्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार?

रक्तपेढी सुविधाही मिळणार

सामान्य रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने बदलापूरच्या रुग्णालयात रक्तपेढीही सुरू होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे रुग्णांना इतर शहरांमध्ये जाण्यावाचून दिलासा मिळणार आहे. शस्त्रक्रिया आणि इतर रुग्णाला रक्त उपलब्ध करून देण्यासाठी बदलापूर आणि ग्रामीण भागातील रुग्णांना मोठी वणवण करावी लागत होती. ती आता थांबणार आहे.

बदलापूर शहराची आरोग्यविषयक गरज खऱ्या अर्थाने या निर्णयामुळे पूर्ण होणार आहे. शहरात विविध तज्ञ उपलब्ध होणार असून शस्त्रक्रिया विभागही सुरू होणार आहे.खाटांची संख्या वाढल्याने रुग्णांना इतर शहरांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. -कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upazila hospital of badlapur has the status of general hospital mrj