ठाणे

शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याला लाभलेले एक थोर रत्नच. त्यांचा इतिहास कितीही जुना झाला किंवा कितीही वेळा ऐकला असेल तरी पुन:पुन्हा ऐकावा असे प्रत्येकालाच वाटत असते. शिवाजी महाराज योद्धा म्हणून कसे होते, व्यक्ती म्हणून कसे होते, राज्यकर्ते तसेच पती म्हणून कसे होते अशा सर्वार्थाने शिवरायांचे दर्शन घडविणारे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे सादरीकरण गडकरी रंगायतन येथे करण्यात येणार आहे. राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्ताने या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.

  • कधी : रविवार, १९ जून ,
  • केव्हा : रात्री ८.३० वाजता
  • कुठे : गडकरी रंगायतन, ठाणे (प.)

 

छायाचित्रांची ‘परदेशी’ सफर

छायाचित्रणाला विषयाचे बंधन नसते. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करायचे आणि हातातील कॅमेऱ्यात प्रसंग टिपत साध्या प्रसंगालादेखील अर्थ प्राप्त करून द्यायचा हे छायाचित्रणाचे कौशल्य म्हणावे लागेल. शब्द, आवाजाचे बंधन नसले तरी टिपलेल्या छायाचित्राचा अर्थ प्रेक्षकांसमोर प्रसंग जिवंत करतो. एका छायाचित्रातून अनेक पैलू सापडले की ते छायाचित्रकाराचे यश असते. हौशी छायाचित्रकार कॅमेऱ्याला आपला मित्र मानत अचूक चित्रणाच्या शोधात असतात. फोटो सर्कल सोसायटीच्या निमित्ताने छायाचित्रणाची आवड असणाऱ्या व्यक्तींना अशी छायाचित्रे पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘द स्विस एस्केप्ड’ हा ७७ वा स्लाइड शो फोटो सर्कल सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. अजय परेळकर आपल्या छायाचित्रांचे प्रदर्शन या स्लाइड शोच्या माध्यमातून दाखवणार आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवेश नोंदणीसाठी ९७०२५५२२३३ / ९८१९९७७९०८ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

  • कधी : रविवार, १९ जून,
  • केव्हा : सायंकाळी ५.३०
  • कुठे : ठाणे कलाभवन, कापूरबावडी, ठाणे (प.)

 

वायुदलाविषयी ‘इंद्रधनु’ संवादह्ण

सीमांचे रक्षण असो वा देशांतर्गत आपत्ती निवारण मोहीम, त्यात भारतीय वायुदलाचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. देशावरील आपत्तीच्या वेळी धावून जाणारे हे वायुदल नेमके कसे आहे,

वायुदलातील साहसी मोहिमा, त्यात गेल्या सहा दशकांत कोणकोणते बदल झाले आहेत, याविषयी दृक्श्राव्य व्याख्यानाचा लाभ येत्या रविवारी

इंद्रधनु संवाद उपक्रमात ठाणेकरांना घेता येणार आहे. निवृत्त एअर मार्शल अरुण गरुड हे वायुदल नेमके आहे तरी कसे आणि त्यापुढील भविष्यकाळातील आव्हाने कोणती, याची माहिती देणार आहेत.

  • कधी :रविवार, १९ जून,
  • केव्हा : संध्याकाळी ६ वाजता
  • कुठे: सरस्वती क्रीडासंकुल सभागृह, मल्हार सिनेमासमोर, ठाणे (प).

 

 हिंदी गाण्यांची सदाबहार मैफल

हिंदी चित्रपटसृष्टीत दरवर्षी शेकडोंच्या संख्येने नवी गाणी रचली जातात. त्यातील बहुतेक लक्षातही राहत नाहीत. मात्र जुनी, अवीट चालीची गाणी मात्र रसिकांच्या मनात कायम घर करून आहेत. त्यातले एखादे गाणे जरी कानी पडले तरी तो दिवस सार्थकी लागल्यासारखे वाटते. येत्या रविवारी १९ जून रोजी संध्याकाळी हिरानंदानी इस्टेटमधील ओयासीस सभागृहात ‘फिर मिलोगे कभी’ ही अशाच सदाबहार गाण्यांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. अस्मिता आर्ट स्वरसंगम या संस्थेच्या वतीने आयोजित या मैफलीत लता मंगेशकर, आशा भोसले, महम्मद रफी, किशोरकुमार, गीता दत्त आदी पाश्र्वगायकांनी गायलेली गाणी ऐकता येतील. ललित मेहता, काश्मिरा रायकर, जुगनू क्षीरसागर, मनीषा वैद्य, सुभाष शर्मा आणि संजय हिरवे हे गायक कलावंत यात सहभागी होणार असून जयंत सद्रे यांचे संगीत संयोजन आहे. प्रवेश विनामूल्य आहे.

  • कधी : रविवार, १९ जून,
  • केव्हा : संध्याकाळी: ६.१५ वाजता
  • कुठे :ओयासिस सभागृह, हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (प).

 

सायंकालीन रागाची अपूर्व  मैफल

कलेचा प्रांत हा नेहमीच सुखावणारा असतो. ठाणेकरांसाठी सायंकालीन रागाची अशीच एक मैफल अनुभवता येणार असून सूर आणि तालाचा आनंद लुटता येणार आहे. कला आनंद या संस्थेतर्फे सायंकालीन रागाची अपूर्व मैफल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गायिका मंजूषा पाटील आपली कला सादर करणार आहेत, तर पंडित विजय घाटे तबला आणि संवादिनीवर अनंत जोशी त्यांना साथसंगत करणार आहेत.

  • कुठे: सहयोग मंदिर सभागृह, घंटाळी ठाणे (प.)
  • कधी : शनिवारी, १८ जून,
  • केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता

 

‘दमलेल्या बाबाची कहाणी’च्या चमूशी संवाद

‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हे गीत सध्याच्या धावपळीच्या युगातील प्रत्येक बाबाची जणू कहाणीच. त्यामुळे अनेकांच्या ते आवडीचे आणि परिचयाचेही. या गाण्यावर आधारित नुकत्याच एका चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटातील कवी-अभिनेते संदीप खरे, संगीतकार सलील कुलकर्णी, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, दिग्दर्शक नितीन चव्हाण व योगेश जाधव आणि निर्माते विशाल धनावडे यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे. ठाण्यातील अभिनय कट्टय़ातर्फे ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या चित्रपटाच्या कलाकारांशी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • कधी : १९ जून, रविवार
  • केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता
  • कुठे :अभिनय कट्टा, जिजामाता उद्यान, ठाणे (प.)

 

जीन्स महोत्सव

प्रत्येक जण अधिक छान दिसण्याचा प्रयत्न निरनिराळ्या पेहरावातून करत असतो. तरुणांमध्ये नवनवीन कपडय़ांची फॅशन नेहमीच लोकप्रिय होते. त्यात टी-शर्ट आणि जीन्स हा तर जणू गणवेशच. वेगवेगळ्या फॅशनची, स्टाइलची जीन्स तरुण-तरुणींसाठी आवडीची असते. इतर कपडय़ांपेक्षा जीन्समध्ये अधिक प्रकार आणि नावीन्य अनुभवयाला मिळते आणि त्यामुळे आरामदायीदेखील वाटते. जीन्सप्रेमींसाठी सध्या ठाण्यातील कोरम मॉल येथे जीन्स महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मॉलमधील बडय़ा जीन्स व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला असून वैविध्यपूर्ण जीन्स, डेनिम जॅकेट, डेनिम शर्ट आदी  कपडय़ांवर भरघोस सूट देण्यात येणार आहे.

  • कधी : १८ ते २६ जून
  • केव्हा : दुपारी १२ ते रात्री ८
  • कुठे : कोरम मॉल, मंगल पांण्डे रोड, पूर्व द्रुतगती मार्गाजवळ, ठाणे (प.)

 

वारीचा रंगमंचीय आविष्कार

आषाढ उजाडला की जशी पावसाची चाहूल लागते तशीच सश्रद्ध वारकऱ्यांच्या मनात पांडुरंगाच्या भेटीची आस लागून राहते. त्यातूनच लाखो भाविक पंढरपूरची वारी करतात. प्रत्यक्ष वारी सुरू व्हायला अजून काही दिवस शिल्लक असले तरी वारीकरांना ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या वारीनाटय़ानिमित्ताने वारी अनुभवता येणार आहे. शुक्रवारी १७ जून रोजी रात्री ८.३० वाजता विष्णुदास भावे नाटय़गृहात वारीचा हा रंगमंचीय आविष्कार सादर होणार आहे. युवराज पाटील आणि डॉ. संदीप माने यांनी हे नाटय़ लिहिले आहे. संकल्पना आणि नृत्य दिग्दर्शन सचिन गजमल यांची आहे.

  • कधी: शुक्रवार, १७ एप्रिल,
  • केव्हा : ८.३० वाजता
  • कुठे : विष्णुदास भावे नाटय़गृह, वाशी

Story img Loader