ठाणे
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या चतुरस्र लेखणीतून उतरलेले ‘ती फुलराणी’ हे नाटक २१ व्या शतकातही आपली लोकप्रियता टिकवून आहे. नवनव्या संचात हे नाटक सादर होत असते. सध्या सुरू असलेल्या ‘ती फुलराणी’ या नाटकातील अभिनेते डॉ. गिरीश ओक, हेमांगी कवी आदी कलावंत शनिवारी डोंबिवलीकरांच्या भेटीला येत आहेत. ‘ती फुलराणी’ या नाटकाचे किस्से, काही वेगळ्या आठवणी ते या वेळी डोंबिवलीकरांसोबत शेअर करणार आहेत. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, युवा विभाग डोंबिवली शाखा व सानिका कुळकर्णी ‘अभिव्यक्ती’ हा विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत. निसर्गकवितांवर आधारित ‘सृष्टिगान’ हा कार्यक्रम बाल कलावंत सादर करतील. नृत्य, गायन आणि अभिजात साहित्याचे अभिवाचन असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
- कधी : शनिवार, २३ जुलै,
- केव्हा : सायंकाळी ४.३० वाजता
- कुठे : आनंद बालभवन, रामनगर, डोंबिवली (पू.)
मुग्धाच्या गळय़ातून बाबूजींची गाणी
मराठी मनावर बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांच्या भावगाण्यांचा प्रभाव आहे. आता एमपीथ्रीच्या युगातही बहुतेक महाराष्ट्रीय घरांमध्ये त्यांची गाणी ऐकली जातात. डोंबिवलीतील स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती दरवर्षी स्व. बाबूजींच्या म्हणजेच सुधीर फडके यांच्या स्मृतिदिनानिमित्त शास्त्रीय-सुगम संगीताची मैफल आयोजित करीत असते. यंदाचा महोत्सव येत्या रविवारी सुयोग मंगल कार्यालयात होत असून ‘सारेगामा लिटिल चॅम्प’ या झी मराठीवरील रिअॅलिटी शोमधून रसिकमान्य झालेली गायिका मुग्धा वैशंपायन बाबूजींनी संगीतबद्ध केलेली भावगीते सादर करणार आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये स्वरतीर्थ शिष्यवृत्ती सोहळाही साजरा होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन आरेकर करणार आहेत. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली येथे ही मैफल रंगणार आहे. सर्व रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
- कधी : रविवार, २४ जुलै,
- केव्हा : सायंकाळी ५.३० वाजता
- कुठे : सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली (पू.)
गुरुगीता
बॉलीवूडचा शोमन म्हणून राज कपूरचे नाव घेतले जात असले तरीही ब्लॅक अॅन्ड व्हाइटच्या दुनियेत मनोरंजनाचे भान राखत एकापेक्षा एक अभिजात चित्रपट देणाऱ्यांमध्ये गुरू दत्त यांचे नाव सिनेरसिक आवर्जून घेतात. गुरू दत्त यांचे चित्रपट आणि गीता दत्त यांची गाणी हे एक त्या वेळचे लोकप्रिय समीकरण होते. अजूनही ती गाणी सिनेरसिकांच्या स्मरणात आहेत. त्या स्मृतींना उजाळा देणारी ‘गुरुगीता’ ही विशेष गाण्यांची मैफल शुक्रवारी डोंबिवलीत सादर केली जाणार आहे. सुप्रसिद्ध गायक अली हुसेन, शमिका भिडे, मुक्ता जोशी, रुपाली घोगर हे गायक मैफलीत गाणी सादर करणार असून सुप्रसिद्ध सिनेअभिनेती मधुरा वेलणकर-साटम सूत्रसंचालन करणार आहे. रोटरी प्रगती ट्रस्ट आणि रोटरी क्लब डोंबिवली वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमातून जमा होणारा निधी शहापूर तालुक्यातील आटगावजवळील गरेलपाडा या आदिवासी गावात कूपनलिका खोदण्यासाठी वापरण्यात येणार आहे. संपर्क: ९८२००९२५३५.
- कधी :शुक्रवार, २२ जुलै,
- केव्हा : रात्री ८.३० वाजता
- कुठे : सावित्रीबाई फुले नाटय़गृह, डोंबिवली (पू.)
बाबूजींच्या गाण्यांचा ‘स्वरोत्सव’
सुधीर फडके यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठिकठिकाणी त्यांच्या गाण्यांच्या मैफली आयोजित केल्या जातात. येत्या रविवारी अशीच एक मैफल मुलुंडमध्ये होणार आहे. बाबूजींच्या गाण्यांवर आधारित या स्वरोत्सवात श्रीरंग भावे, अर्चना गोरे, माधुरी करमरकर, मंदार आपटे यांसारखे तरुण कलावंत सहभागी होणार आहेत. अभिनेत्री समीरा गुजर-जोशी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
- कधी : रविवार, २४ जुलै,
- केव्हा : सायंकाळी ६ वाजता
- कुठे : मराठा मंडळ हॉल, मुलुंड (प.)
स्टेट बँक सेवानिवृत्तांतर्फे ‘हास्य दरबार’
डोंबिवली – स्टेट बँक सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या कल्याण डोंबिवली शाखेतर्फे शुक्रवार, २२ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता टिळक विद्यामंदिराच्या पेंढरकर सभागृहात ‘हास्य दरबार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला स्टेट बँकेतील सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अविनाश मुजुमदार यांनी केले आहे.
- कधी : शुक्रवार, २२ जुलै,
- केव्हा : संध्याकाळी- ६ वाजता
- कुठे : टिळक विद्यामंदिरचे पेंढरकर सभागृह, डोंबिवली (पूर्व)
कथकचा नृत्य आविष्कार..
कथ्थक नृत्याद्वारे मनातील भावभावना उत्तम प्रकारे सादर करता येतात. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या मार्गदर्शक गुरूसमोर कथ्थक नृत्य सादर करणे हा शिष्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा क्षण असतो. डोंबिवलीतील लहेजा नृत्यवर्गानेही चौथ्या वर्धापन दिनानिमित्त येत्या शनिवारी डोंबिवलीत कथ्थक नृत्याविष्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात वर्गात शिकणाऱ्या नर्तिका आपली कला सादर करणार आहेत. त्यांना स्वप्निल भिसे (तबला), मंदार दीक्षित (संवादिनी), कौस्तुभ आपटे (गायन), अमृता लोखंडे (सतार) हे साथ करणार आहेत. आकांक्षा मेहेंदळे कार्यक्रमाचे निवेदन, तर कथ्थक नृत्याचा प्राण असणाऱ्या पढतचे पठण श्रीकला जोशी करणार आहेत. या वेळी ज्येष्ठ तबलावादक प्रवीण करकरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
- कधी : शनिवार, २३ जुलै,
- केव्हा : सायंकाळी ६ वाजता
- कुठे : वक्रतुंड सभागृह, गणेश मंदिर संस्थान, फडके रोड, डोंबिवली (पूर्व)
फळांच्या साबणाने स्नान करा
रासायनिक वस्तूंनी आपले अवघे जीवन व्यापून टाकले आहे. सकाळी लागणारे दंतमंजन, साबण ते दिवसभरात वापरल्या जाणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांपर्यंत सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात घातक असणाऱ्या रसायनांचा वापर केलेला असतो.
रोजच्या दिनचर्येतील या रसायनांचा वापर कमी व्हावा या हेतूने कोरम मॉलने येत्या बुधवारी ‘वुमन्स ऑन वेन्सडे’ उपक्रमात विविध फळांच्या अर्कापासून साबण तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. घरच्या घरी फळांपासून साबण कसा बनवायचा याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जाणार आहे. बुधवारी दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत कोरम मॉलमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असून प्रवेश विनामूल्य आहे.
- कधी : बुधवार, २८ जुलै,
- केव्हा : दुपारी ३ ते रात्री ८
- कुठे :कोरम मॉल, मंगल पांडे मार्ग, पूर्व द्रुतगती मार्गाजवळ, ठाणे (प.)
‘संशयकल्लोळ’मध्ये आनंद भाटेंचा जलसा
नाटकाला प्रयोग म्हटले जाते, कारण संहिता तीच असली तरी त्यात रोज काही तरी नवे पाहायला मिळते. सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या प्रशांत दामले फॅन क्लब निर्मित ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकाच्या ५० व्या प्रयोगानिमित्त असाच नावीन्यपूर्ण प्रयोग केला जाणार आहे. नाटकात प्रशांत दामले आणि पं. राहुल देशपांडे यांच्यासोबत सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे पाहुणे कलावंत म्हणून उपस्थित राहून खास जलसा सादर करणार आहेत. ठाणेकर रसिकांसाठी हा एक अपूर्व योग आहे.
- कधी : शुक्रवार, २२ जुलै,
- केव्हा : सायंकाळी ७ वाजता
- कुठे : गडकरी रंगायतन, ठाणे (प.)