ठाणे

माणसाने आपल्याला आलेल्या अनुभवांची कलात्मक, सौंदर्यपूर्ण मांडणी केली की त्यातून कला आकार घेते. अशा प्रकारचा आनंद व्यक्त करण्याच्या प्रवृत्तीतूनच नृत्य कलेचा उगम झाला. लयबद्ध आणि डौलदार शारीरिक हालचालीतून शब्दांशिवाय संवाद साधला जातो. ठाण्यातील निवेदिता रानडे संचालित नूपुर नृत्यालय या संस्थेने १९ वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा यांचे औचित्य साधून ‘नृत्यनाद २०१६’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. धनश्री लेले यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘यमनरंग’ ही शास्त्रीय रागांवर आधारित गाण्यांची मैफल हे यंदाच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण आहे. यावेळी सुप्रसिद्ध नृत्यांगना डॉ.मंजिरी देव, श्रीराम देव, आमदार संजय केळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  • कधी: रविवार, ३१ जुलै
  • केव्हा :वेळ-सकाळी १०.३० वाजता
  • कुठे: गडकरी रंगायतन, ठाणे (प.)

 

बाबूजींच्या अजरामर गीतांची सफर

मराठी भावसंगीताचा इतिहास लिहायचा सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांना टाळून लिहिणेच शक्य नाही. बाबूजींनी संगीतबद्ध केलेली गाणी अजरामर होऊन आजही रसिकांचे भावविश्व बहरवत आहेत. आजही सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गाण्यांच्या मैफिली रसिकांना खुणावत असतात. येत्या शनिवारी ३० जुलै रोजी ठाण्यात सुधीर फडके यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त ‘रंगाई’च्या वतीने ‘बाबूजींची गाणी’ ही विशेष मैफल आयोजित करण्यात आली आहे. शिल्पा पुणतांबेकर, धनश्री देशपांडे यांच्यासोबत दस्तुरखुद्द संगीतकार, गायक श्रीधर फडके या मैफलीत वडिलांची गाणी सादर करणार आहेत. मनाच्या सांदी कोपऱ्यात बाबूजींची गाणी जपून ठेवणाऱ्या रसिकांसाठी ही मैफल म्हणजे एक पर्वणी आहे.

  • कधी : शनिवार,
  • केव्हा : ३० जुलै, रात्री-८.३०
  • कुठे :गडकरी रंगायतन, ठाणे

 

महम्मद रफी संगीतरजनी

हिंदी चित्रपटसृष्टीत महम्मद रफी यांच्या गाण्यांचे स्थान धुव्र ताऱ्यासारखे अढळ आहे. त्यांच्या सहाबहार गाण्यांचे असंख्य चाहते आहेत. उल्हासनगर येथे तर डॉ. प्रभू आहुजा यांच्या पुढाकाराने महम्मद रफी फॅन क्लब स्थापन करण्यात आला आहे.

दरवर्षी महम्मद रफी यांच्या स्मृतीदिनी जुलै महिन्यात महम्मद रफी यांच्या गाण्यांची मैफल शहरात आयोजित केली जाते. यंदाही रविवार, ३१ जुलै रोजी उल्हासनगरमधील टाऊन हॉलमध्ये संध्याकाळी ७ वाजता ‘मेरा सलाम लेलो’ ही रफीगीतांची विशेष मैफल सादर होणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ  पाश्र्वगायिका पुष्पा पागधरे यांच्या हस्ते महम्मद रफी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरणही होणार आहे. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.

  • कधी- रविवार, ३१ जुलै,
  • केव्हा : संध्याकाळी- ७ वाजता.
  • कुठे :टाऊन हॉल, उल्हासनगर.

 

फिर रफी

गेली काही वर्षे जुलै महिना आणि श्रीकांत नारायण यांची ‘फिर रफी’ ही मैफल यांचे जणू काही समीकरणच बनले आहे. महम्मद रफी यांचे चाहते या मैफलींचा वाट पाहत असतात. येत्या रविवारी ३१ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये ‘जीवनगाणी’ संस्थेच्या वतीने ‘फिर रफी’ सादर होणार आहे. सरिता राजेश सहगायिका म्हणून या मैफलीत श्रीकांत नारायण यांना साथ देणार आहेत. संगीत संयोजन देवा बंगोरा यांचे असून संदीप कोकीळ निवेदन करणार आहेत. प्रसाद महाडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली मैफल म्हणजे रफीप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे.

  • कधी- रविवार, ३१ जुलै.
  • केव्हा :रात्री ८.३०.
  • कुठे: गडकरी रंगायतन, ठाणे.

 

रागदारी रफी

‘चाहे मुझे कोई जंगली कहे’सारख्या उडत्या चालीची गाणी गाणाऱ्या महम्मद रफी यांनी ‘मधुबन में राधिका नाचे रे’सारखी अनेक शास्त्रीय रागदारीवर आधारित गाणीसुद्धा गायली आहेत. यंदा त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्हर्टिकल नोट्स या संस्थेतर्फे डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी नाटय़गृहात ‘रागदारी आणि रफीसाहेब’ ही विशेष मैफल आयोजित केली आहे. महम्मद रफी यांनी विविध संगीतकरांकडे गायलेल्या गाण्यातील रागदारी या मैफलीत उलगडून दाखविली जाणार आहे. ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत अभ्यासक अमरेंद्र धनेश्वर आणि सुप्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना संदीप मिश्र (सारंगी) आणि अथर्व कुलकर्णी (तबला) साथ करणार आहेत.

  • कधी: रविवार, ३१ जुलै.
  • केव्हा : संध्याकाळी ४ ते ७.
  • कुठे : डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी सभागृह, ठाणे.

 

पावसाळी काव्य मैफल

एकीकडे मुसळधार आषाढसरी कोसळत असताना हळव्या कविता ऐकण्याचा अनुभव विलक्षण असतो. म्हणूनच कल्याण पूर्व विभागातील श्रीज्ञानेश्वर माऊली ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने पावसाळी काव्य मैफल आयोजित करण्यात आली आहे. येत्या शनिवारी ३० जुलै रोजी संध्याकाळी ५.३० वाजता नूतन ज्ञानमंदिर हायस्कूल, ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालय, पुना लिंक रोड, कल्याण (पूर्व) येथे ही मैफल होणार आहे. पूर्व नोंदणी करून नवोदित कविंना त्या मैफलीत आपल्या काव्य रचना सादर करता येतील. संपर्क-सुरेखा गावंडे-९८६९११६४४४.  वर्षां कळके- ९८३३१६४१५८.

  • कधी : शनिवार, ३० जुलै,
  • केव्हा : संध्याकाळी-५.३० वाजता
  • कुठे:  नूतन ज्ञानमंदिर हायस्कूल, पूना लिंक रोड, कल्याण (पूर्व)

 

‘शोध सावित्रीचा’

सावित्री म्हटले की यमाकडून पती सत्यवान याचे प्राण परत मिळविणारी पतीव्रता इतकेच बहुतेकांना ठाऊक असते. वटपौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी तिचे स्मरण केले जाते. ठाण्यातील लीलाताई जोशी मात्र गेली तीन दशके सावित्री या व्यक्तिरेखेचा अभ्यास करीत आहेत. त्याच संशोधनाच्या आधारे त्यांनी सावित्रीच्या जीवन चरित्रावर लिहिलेल्या कांदबरीचे प्रकाशन येत्या शनिवारी, ३० जुलै रोजी ठाण्यात होणार आहे. सुप्रसिद्ध लेखक दाजीसाहेब पणशीकर आणि आबासाहेब पटवारी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित राहणार आहेत.

  • कधी : शनिवार ३० जुलै, ’ केव्हा : संध्याकाळी ४.३० वाजता
  • कुठे : सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे (प.)

कॉफीचा क्लास

धकाधकीच्या आणि व्यस्त दिनक्रमात थोडा ब्रेक घेऊन पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी विसाव्याचा ब्रेक हवा असतो. अशा वेळी एक कप गरमागरम कॉफी अमृताचे काम करते. कॉफीचे निरनिराळे प्रकार अस्तित्वात आहेत. आता ‘रेडी टु मिक्स’ उपलब्ध असली तरी मुळात कॉफी बनविणे ही एक कला आहे. त्यामुळे कोरम मॉलमध्ये दर बुधवारी राबविल्या जाणाऱ्या ‘वुमन्स ऑन वेन्सडे’ उपक्रमात यावेळी कॉफीचा क्लास घेतला जाणार आहे. अमेरिकाने ते फ्रार्पचिनोपर्यंतचे विविध थंड आणि गरम कॉफीचे निरनिराळे प्रकारचे कॉफीचे प्रकार या कार्यशाळेत शिकविले जाणार आहेत.

  • कधी: बुधवार, ३ ऑगस्ट
  • केव्हा: वेळ- दुपारी- ३ ते रात्री ८
  • कुठे: कोरम मॉल, मंगल पांडे मार्ग, पूर्व द्रुतगती मार्गाजवळ, ठाणे(प.)

गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्यांची मैफल

गुरुपौर्णिमेनिमित्त महिनाभर ठीकठिकाणी सांगीतिक मैफली आयोजित केल्या जातात. त्यानिमित्ताने शिष्य गुरूकडून प्राप्त कलेचे सादरीकरण करीत असतात. ‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा’ अशा प्रकारचे आश्वासन शिष्य या मैफलींच्या निमित्ताने आपल्या गुरूंना देत असतात. प्राचीन गुरू-शिष्य परंपरेचे विलोभनीय दर्शन त्यातून घडत असते. अशीच एक सुरेल मैफल येत्या शनिवारी ३० जुलै रोजी डोंबिवलीत आयोजित करण्यात आली आहे.  पं. मधुकर जोशी यांचे शिष्यगण आपली कला सादर करणार आहेत.

  • कधी: शनिवार, ३० जुलै , ’ केव्हा : वेळ- सायंकाळी ४ ते १०
  • कुठे : वक्रतुंण्ड सभागृह, गणेश मंदिर, डोंबिवली

 

झाडांची ओळख परेड

अतिपरिचयात अवज्ञा अशी निसर्गाविषयी आपली अवस्था असते. आपल्या अवतीभोवती आपण नेहमी विविध प्रकारची झाडे पाहत असतो. मात्र त्यापैकी अनेक झाडांची नावेही आपल्याला ठाऊक नसतात. निसर्ग भ्रमंतीमधून या वृक्षवेलींचा परिचय करून घेता येतो.

पर्यावरण दक्षता मंच या संस्थेच्या वतीने येत्या रविवारी, ३१ जुलै रोजी कल्याण परिसरात नेचर ट्रेल आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये विविध झाडांची नावे, त्यांची वैशिष्टय़े, त्यांचे संगोपन कसे करावे, त्यांचा आपल्या आयुष्यात होणारा उपयोग याविषयी माहिती दिली जाणार आहे.

  • कधी: रविवार, ३१ जुलै.
  • केव्हा : सकाळी ७.३० ते १० वाजता.
  • कुठे-  आंबेडकर उद्यानाचा मुख्य दरवाजा, कल्याण (प.).

Story img Loader