लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: एक देश एक निवडणूक या संकल्पनेचे मूळ उद्दिष्ट हे संपूर्ण देशात एक पक्ष निवडून यावा असे आहे. २०२४ ची निवडणूक लोकसभेची निवडणूक नाही तर भारताच्या संविधानाची निवडणूक आहे. यातून भारताचे भवितव्य स्पष्ट होणार आहे, असे प्रतिपादन स्वराज इंडियाचे संस्थापक योगेन्द्र यादव यांनी शनिवारी ठाण्यात केले.
स्वराज इंडियाचे दिवंगत प्रदेश उपाध्यक्ष संजीव साने यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त स्वराज इंडिया आणि स्वराज अभियान ठाणे यांच्या तर्फे “२०२४ की चुनौती” या विषयावर ठाण्यात शनिवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. योगेन्द्र यादव यांनी या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा जिंकला तर, त्यानंतर निवडणुका होणार नाहीत, असा गैरसमज अनेकांना झाला आहे. परंतु असे होणार नाही. यापुढेही निवडणुका होत राहतील. कदाचित त्याचे स्वरूप बदललेले असू शकते. २०२४ ची निवडणूक ही भारताच्या संविधानाची निवडणूक आहे. हे मुळात समजून घेण्याची गरज आहे. मुस्लिम समाजासोबत होणारी हिंसा ही काही नवी नाही. यापूर्वीही अशा प्रकारची हिंसा होत होती. परंतु, आता जी हिंसा होत आहे, ती रस्त्यावर उतरून केली जात आहे. हिंसा करण्यासाठी शस्त्र घेण्याची प्रत्येक वेळी गरज नसते. शब्दांच्या मार्फत हिंसा होऊ शकते, असे यादव यांनी सांगितले.
आणखी वाचा-ठाणे : कौटुंबिक वादातून बहिणीची हत्या
भारत जोडो यात्रेपासून देशाचे वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे. तसेच सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येत स्थापन केलेल्या ‘इंडिया’ या संघटनेमुळे भाजपाच्या पराभवाची आशा वाढली आहे. केवळ या संघटनेतील सर्व पक्ष प्रमुखांनी एकत्रित येत त्यांचे विचार बाजूला ठेवून देश वाचविण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. हा संघर्ष बेरोजगारी, महागाई, जातीय विषमता या विषयाला धरुन रस्त्यावर उतरुन केला पाहिजे. याचा परिणाम राज्य-राज्यातून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निघून जातील असा झाला पाहिजे. कारण, भाजपाचे यश हे संघ आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. आज ही देशात ९० टक्के लेखक असे आहेत की, ते भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात आहेत, असा दावाही त्यांनी केला.