रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीतील रस्ते भूमिपूजन कार्यक्रमांसाठी येत आहेत. त्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गात खड्डे नको म्हणून स्थानिक प्रशासनांनी खड्डे बुजविण्याची कामे शुक्रवारपासून हाती घेतली आहेत. मात्र, या कामांसाठी वापरण्यात येत असलेली डांबर ही राॅकेल मिश्रित असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा- ‘जितेंद्र आव्हाडांना बेकायदेशीरपणे अटक’; आव्हाड यांच्या वकिलांचा न्यायालयात युक्तीवाद
रस्त्यावर दोन ते तीन इंचाचा डांबर, बारीक खडीचा थर टाकून प्रशासन अपघातांना आमंत्रण देत आहे. रस्त्यावरील जुना डांबराचा थर न काढता वरच्या वर डांबर, खडी टाकून प्रशासन तात्पुरती मलमपट्टी करत असली तरी अवजड वाहनाने ही खडी निघणार आहे. या खडीवर दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढेल, अशी माहिती नागरिकांनी अधिकाऱ्यांना दिली. पण अधिकाऱ्यांनी आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत. त्यामुळे आम्ही ही कामे करणारच असा आक्रमक पवित्रा घेत खड्डे भरणीची कामे निकृष्ट दर्जाच्या डांबराचा वापर करुन पूर्ण करण्यात आली आहेत. शहरात मंत्री येणार आहेत. त्यांना दाखविण्यासाठी वरवरची कामे करुन मंत्र्यांना खूष आणि स्थानिक नागरिकांना फसविण्याचा कार्यक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे, अशी टीका नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा- मीरा भाईंदर नाट्यगृहातील पहिला प्रयोग रद्द; नाट्यगृहात त्रुटी असल्याचा निर्मात्यांचा आरोप
गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली एमआयडीसी, वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे पूर्ण करा म्हणून प्रवाशी ओरडून थकले आहेत. या भागातील अनेक शाळा चालकांनी पालिका, एमआयडीसी कार्यालयाचे उंबरठे झिजवले. त्याची दखल पालिका, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेतली गेली नाही. मात्र, शहरात मुख्यमंत्री येणार आहेत हे समजताच स्थानिक प्रशासनांनी तातडीने रस्ते डांबरीकरण काही ठिकाणी काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत.
हेही वाचा- जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांना वेळीच आवर घालावा; लोकप्रतिनिधींची ठाण्याच्या पालकमंत्र्यांकडे मागणी
शुक्रवारी संध्याकाळी रस्ते बांधकामातील एका जागरुक नागरिकाने आपले वाहन बाजूला घेऊन, डांबरीकरण करत असलेल्या अधिकाऱ्यांना आपण चुकीच्या पध्दतीने आणि निकृष्ट दर्जाची डांबर वापरुन रस्ते कामे करत आहात याची जाणीव करुन दिली. ही दृश्यचित्रफित समाज माध्यमांत अधिक प्रमाणात पसरली आहे. प्रशासनांच्या या तात्पुरत्या रस्ते मलमपट्टीवर नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.