प्रभागातून निर्माण झालेले प्लास्टिक डांबरात मिसळून रस्ता तयार करण्याचा प्रयोग बदलापूरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये करण्यात येत आहे. त्याची सुरूवात बुधवारी झाली. प्रभागातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्लास्टिक वापरले जाणार आहे.
घनकचरा व्यवस्थापनात वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेने प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर प्लास्टिकचा वापर रस्तेबांधणीसाठी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. स्वच्छ सर्वेक्षणात शहर पातळीवर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या आरोग्य सभापती श्रीधर पाटील यांच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये या प्रयोगाला बुधवारी सुरुवात झाली.
या प्रभागात शून्य कचरा मोहीम राबवण्यात येत आहे. ओल्या कचऱ्यावर प्रभागातच प्रक्रिया करून त्याच्यापासून खत तयार केले जाते. तर प्लास्टिक आणि इतर कचऱ्याची विक्री करून त्यापासून कचरा वेचकांना उत्पन्न मिळते आहे. दररोज गोळा होणाऱ्या ७० ते ८० किलो प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यासाठी आता प्रभागांत डांबरी रस्त्यांच्या निर्मितीत प्लास्टिकचा वापर केला जात आहे.
डांबराच्या आठ टक्के भाग प्लास्टिक वितळवून त्याचे मिश्रण तयार केले जाते. एसपी मैदानाशेजारील रस्त्यावर या मिश्रणाचा वापर केला जात आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे, आरोग्य सभापती श्रीधर पाटील, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि नागरिक उपस्थित होते.