एकीकडे महापालिका प्रशासन शहर हिरवे करण्याच्या नवनव्या संकल्पना आणि योजना मांडत असताना दुसरीकडे झाडांचा जीव घेण्यासाठी त्यांच्यावर विषप्रयोग केला जात असल्याचे आता उघड होत आहे. ठाणे शहरातील वंदना एस.टी. स्थानकालगतच्या रस्त्यावर ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात अगदी हिरवागार असलेला हा कदंब वृक्ष अशाच विषप्रयोगामुळे अवघ्या १५ दिवसांनंतर कोमेजू लागला आहे.या कदंब वृक्षाच्या फांद्यांमुळे रस्त्यावरून पलीकडे असणारे जाहिरात फलक दिसत नाहीत. त्यामुळे गेली काही वर्षे न चुकता पावसाळ्यापूर्वी छाटणीच्या नावाखाली या वृक्षाला जबर इजा केली जाते. मात्र तरीही एक-दोन महिन्यात झालेल्या जखमा भरून काढत हे झाड जोमाने वाढते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या झाडावर इंजेक्शनद्वारे विषप्रयोगकरण्यात आल्याचे स्थानिक फेरीवाल्यांनी सांगितले. या कदंब वृक्षालगत एक कांचन वृक्ष असून त्याचेही अशाच पद्धतीने हाल सुरू आहेत. दरवर्षी फांद्या छाटण्यापेक्षा एकदाच विषप्रयोग करून हा विषय कायमचा संपवून टाकण्याचा संबंधितांचा डाव असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
तथ्य आढळल्यास कारवाई
संबंधित ठिकाणी पाहणी करून सखोल चौकशी केली जाईल. असे काही घडले असेल तर संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल.
– ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त, ठाणे महापालिका

Story img Loader