भाडेकरूंच्या पदरी मात्र रेंटलच्या नरकयातना , रिकाम्या इमारती गर्दुल्ले आणि जुगाऱ्यांचे अड्डे
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नौपाडय़ातील कृष्णनिवास इमारत कोसळून झालेल्या अपघातानंतर महापालिकेने अगदी घाईघाईने अवघ्या काही तासांच्या मुदतीवर खाली केलेल्या हरिनिवास सर्कल येथील यशवंत कुंज आणि अजिकृपा या दोन इमारती आता वर्षभरानंतरही उभ्याच असून त्यांची वीटसुद्धा अद्याप निखळलेली नाही. सध्या या भकास इमारती गर्दुले आणि जुगाऱ्यांचे अड्डे बनल्या आहेत. त्यामुळे कोणतेही संरचनात्मक परीक्षण न करता घाईघाईने आम्हाला नेसत्या कपडय़ांनिशी इमारतीबाहेर बाहेर का काढण्यात आले, असा सवाल येथील मध्यमवर्गीय कुटुंबे विचारीत आहेत.
कृष्ण निवास दुर्घटनेनंतर नौपाडय़ातील अनेक धोकादायक इमारती नोटीसा देऊन खाली करण्यात आल्या. त्यातील बहुतेक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. मात्र यशवंत कुंज आणि अजिकृपा या दोन इमारती मात्र त्याला अपवाद ठरल्या. या दोन्ही इमारतीतून बाहेर पडलेली साठहून अधिक कुटुंबे सध्या महापालिकेच्या नौपाडय़ातील रेंटल हाऊसिंग इमारतीत आश्रयास आली आहेत. मात्र दोन हजार रूपये दरमहा भाडे भरूनही या ठिकाणी प्राथमिक सुविधांची मात्र वानवा आहे. त्यामुळे आगीतून फोफाटय़ात पडल्यासारखी या कुटुंबियांची अवस्था आहे. अनधिकृत इमारतींना नियमानुकुल करण्याचे धोरण अवलंबलेल्या शासनाने अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी आवश्यक जादा चटईक्षेत्र देण्याबाबत मात्र उदासिनता दाखवली आहे.
त्यामुळे मालक-भाडेकरू वाद टोकाला जाऊन जुन्या ठाण्यातील शेकडो अधिकृत इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे.
गेल्यावर्षी कृष्णनिवास दुर्घटनेनंतर अशा धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना नोटीसा देऊन घराबाहेर काढण्यात आले. त्यातील काही कुटुंबांनी आपापली व्यवस्था अन्यत्र अथवा नातेवाईकांकडे केली. मात्र बहुतेकांकडे कोणताही पर्याय नसल्याने त्यांनी रेंटल हाऊसिंगमध्ये आश्रय घेतला आहे. शहरातील अन्य काही ठिकाणच्या धोकादायक इमारतीत राहणाऱ्या कुटुंबांची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे.
त्यातील बहुतेकजण वयोवृद्ध असून ते सर्व पुन्हा एकदा आपल्या मूळ जागेत बांधल्या जाणाऱ्या नव्या इमारतीत रहायला जाण्याची आशा बाळगून आहेत. भाडेकरूंच्या संमतीशिवाय इमारतीचा आराखडा मंजूर होणार नसला तरी भाडेकरूंना कोणतीही हमीपत्रे देण्यात आलेली नाहीत. शिवाय त्यासाठी काळही निश्चित करण्यात आलेला नाही.

असुविधांचे आगर
नौपाडय़ातील १६ मजली रेंटल हाऊसिंग इमारतीतील प्रत्येकी १६० चौरस फुट घरांमध्ये या कुटुंबियांनी सध्या कसाबसा आश्रय घेतला आहे. या इमारतीत सुरक्षा रक्षक, लिफ्टमन आणि स्वच्छतादूत नाहीत. छतावरून पाणी गळते. भिंतींनाही ओल आली आहे. दूषीत पाणी पुरवठा होतो. इमारतीचे दोन वर्षांपासूनचे पाणी बिल थकल्याने रहिवाशांकडून चालू बिल स्वीकारले जात नाही. सध्या भाडेकरू प्रत्येकी शंभर रूपये वर्गणी काढून इमारतीची स्वच्छता करतात. वास्तविक
इमारतीच्या तिन्ही बाजूंना रहिवाशांना जाण्यासाठी वाटा आहेत. मात्र त्यातील दोन वाटा बांधकाम व्यावसायिकाने बंद करून ठेवल्या आहेत. त्या वाटा मोकळ्या करून द्याव्यात, अशी रहिवाशांची मागणी आहे. महापालिका प्रशासनान
* त्वरित या असुविधा दूर कराव्यात, अन्यथा दोन हजार रूपये भाडे न भरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना महापालिकेने त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटेपर्यंत रेंटल हाऊसिंगमध्ये निवारा दिला आहे. तिथे काही समस्या आणि असुविधा असतील, तर त्या त्वरित दूर करण्यात येतील.
-संदीप माळवी, जनसंपर्क अधिकारी, ठाणे महापालिका

Story img Loader