ठाणे : महापालिकेला नाकाद्वारे देण्यात येणारी ‘इन्कोव्हॅक’ या करोना लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. शहरातील सहा केंद्रांवर पालिकेने शुक्रवारपासून लसीकरण सुरु केले असून त्याठिकाणी कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने किंवा अधिक काळ झालेल्या ६० वर्षे वयावरील नागरिकांना या लशीची वर्धक मात्रा देण्यात येत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून करोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. शहरात दररोज ४० ते ५० रुग्ण आढळून येत आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरात करोना चाचण्याची संख्या वाढविण्यात आली आहे. याशिवाय, रुग्ण उपचारासाठी व्यवस्था पालिकेने तयार केली आहे. शहरातील अनेक नागरिकांनी यापुर्वीच करोना लशीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. तर, काही नागरिकांनी वर्धक मात्रा घेतल्या आहेत. ज्या नागरिकांनी वर्धक मात्रा घेतलेली नाही, ते नागरिक करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर लशीच्या शोधात फिरत आहेत. परंतु पालिकेकडे लशींचा साठा उपलब्ध नसल्याने ते वर्धक मात्रेपासून वंचित होते.
हेही वाचा >>> कल्याण मध्ये विकासकाच्या मृत्यू नंतर वारसांचा खरेदीदारांना घरांचा ताबा देण्यास नकार
दरम्यान, पालिकेला आता अडीचशे ‘इन्कोव्हॅक’ या लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. हा साठा उपलब्ध होताच पालिकेने शहरातील सहा लसीकरण केंद्र शुक्रवारपासून सुरु केली आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कौसा आरोग्य केंद्र, मानपाडा आरोग्य केंद्र, शिळ आरोग्य केंद्र, सीआर वाडीया आणि लोकमान्यनगर आरोग्य केंद्र या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर ही लस देण्यात येत आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने किंवा अधिक काळ झालेल्या ६० वर्षे वयावरील नागरिकांना या लशीची वर्धक मात्रा देण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.