ठाणे : केंद्र शासनाच्या आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने ठाणे महापालिकेने शहरातील ३२ केंद्रांवर वर्धक मात्रेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच शहराच्या विविध भागांमध्ये शिबीरांचे आयोजन करून त्यात नागरिकांना वर्धक मात्रा देण्यात येत असून त्याचबरोबर हर घर दस्तक योजनेंतर्गत घरोघरी जाऊनही वर्धक मात्रा दिली जात आहे. या सर्व उपक्रमांतर्गत पालिकेने गेल्या तीन दिवसांत ९ हजार २९५ नागरिकांना वर्धक मात्रा देण्यात आली आहे. या उपक्रमाशिवाय कोव्हीड कॉल सेंटरद्वारे ठाणेकरांना मोबाईलवरून संपर्क साधून वर्धक मात्रा घेण्यासाठी आवाहन केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १७ लाख ९ हजार नागरिकांनी करोना लशीची पहिली मात्रा घेतली आहे. त्यापैकी १६ लाख ७० हजार नागरिकांनी महापालिका हद्दीत तर, उर्वरित नागरिकांनी पालिका हद्दीबाहेर लस घेतली आहे. लशीची पहिली मात्रा घेण्याचे प्रमाण शंभर टक्के आहे. शहरात १४ लाख २६ हजार नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली असून त्याचे प्रमाण ८७ टक्के नागरिकांनी घेतली आहे. उर्वरित १३ टक्के नागरिकांनी पालिका क्षेत्राबाहेर लस घेतली असावी असा पालिकेचा अंदाज आहे. तर आतापर्यंत ९७ हजार ५३६ नागरीकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. ६० वर्षापुढील नागरिकांना वर्धक मात्रा देण्याचे आरोग्य विभागाचे आदेश होते. यामुळे पालिका केंद्रांवर वर्धक मात्रा घेण्याचा दररोजचा आकडा दोनशेच्या आतच असल्याचे चित्र होते. परंतु स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने करोना विषाणू प्रतिबंधात्मक लशीची वर्धक मात्रा १८ ते ५९ वयोगटाला सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर मोफत देण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले असून यामुळे ठाणे महापालिकेच्या ३२ केंद्रावर आता नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.

ठाणे महापालिकेने १५ जुलैपासून शहरातील ३२ केंद्रांवर वर्धक मात्रेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच गेल्या तीन दिवसांत शहरातील १४ ठिकाणी लसीकरण शिबीरे घेऊन त्यात नागरिकांना वर्धक मात्रा दिल्या आहेत. त्याचबरोबर हर घर दस्तक योजनेंतर्गत घरोघरी जाऊनही वर्धक मात्रा दिली जात आहे. या सर्व उपक्रमांतर्गत पालिकेने गेल्या तीन दिवसांत ९ हजार २९५ नागरिकांना वर्धक मात्रा देण्यात आली असून त्यापैकी ३ हजार ९०८ जणांचे सोमवारी दिवसभरात लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण केलेल्या नागरिकांचे मोबाईल क्रमांक पालिका प्रशासनाकडे उपलब्ध असून त्याद्वारे नागरिकांना कोव्हीड कॉल सेंटरच्या माध्यमातून संपर्क साधून वर्धक मात्रा घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. पुढील आठवड्यात वागळे औद्योगिक केंद्र, टीसीएस यासारख्या औद्योगिक क्षेत्रात वर्धक मात्रेसाठी शिबीरे घेण्याचा विचार असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaccination camps in the city for booster dose of thane municipal corporation amy