कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत गोवर प्रतिबंधित लशीची पहिली आणि दुसरी मात्रा देण्याची मोहीम नुकतीच पार पाडली. या मोहिमेत ७३९ लाभार्थींना गोवर प्रतिबंधित लशीची पहिली आणि ७९४ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात १० दिवस गोवर प्रतिबंधित लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. अश्विनी पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा- कल्याण- डोंबिवली पालिका उभारणार स्वत:ची जल तपासणी प्रयोगशाळा
गोवर प्रतिबंधित लशीची मात्रा नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील लसीकरणास पात्र लाभार्थींना देण्यात आली. ज्या लाभार्थींनी गोवर लशीची पहिला आणि दुसरी मात्रा घेतली नव्हती अशी मुले घरोघरी सर्व्हेक्षण करुन शोधण्यात आली. त्या लाभार्थींना जवळच्या आरोग्य केंद्रात आणि बाह्य लसीकरण सत्रात लसीकरण करण्यात आले.
हेही वाचा- कल्याण: फलक लावून शहर विद्रुप करणाऱ्यांवर महापालिका दाखल करणार फौजदारी गुन्हे
मोहन परिसरात गोवरचे दोन रुग्ण आढळून आले होते. या भागात सहा ते पाच वर्ष वयोगटातील तीन हजार १३७ लाभार्थींना गोवर प्रतिबंधित लस देण्यात आली. गोवर लस मोफत देण्यात येत आहे. ज्या लाभार्थींचा गोवर प्रतिबंधित लशीची पहिली, दुसरी मात्रा चुकली आहे. त्यांनी तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन लशीची मात्रा घ्यावी, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.