राज ठाकरे स्वत:ची नाही तर नेहमी दुसऱ्यांची भूमिका सांगत असतात. ते ज्या उमेदवाराच्या प्रचाराला जातात, त्या उमेदवारांचा पराभव निश्चित असतो, अशी खोचक टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी केली आहे. ते आज महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाण्यात आले होते. यावेळी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी प्रचारसभांवरून राज ठाकरेंवर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले वैभव नाईक?

“राज ठाकरे स्वत:ची नाही, नेहमी दुसऱ्यांची भूमिका सांगत असतात. ते नेहमी दुसऱ्यांची स्क्रिप्ट वाचतात. आज तुम्ही बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला गर्दी होताना दिसत नाही. त्यामुळेच त्यांना राज ठाकरेंच्या सभा आयोजित कराव्या लागत आहेत. मात्र, राज ठाकरे ज्या उमेदवारांसाठी सभा घेतात, त्या उमेदवारांचा पराभव निश्चित असतो, हा इतिहास आहे”, अशी खोचक टीका वैभव नाईक यांनी केली.

हेही वाचा – “तेव्हापासून ही बाई हवेत उडू लागली आहे”, सुषमा अंधारेंच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचा हल्लाबोल

यावेळी बोलताना त्यांनी नारायण राणेंसाठी घेतलेल्या सभेवरूनही राज ठाकरे यांना लक्ष्य केलं. “नारायण राणेंच्या प्रचाराला राज ठाकरेंनी जाणे किंवा राणेंच्या प्रचाराला एकनाथ शिंदेंनी जाणं, हा मुळात बाळासाहेबांचा अपमान आहे. हा अपमान शिवसैनिक कधीही सहन करू शकत नाही. या अपमानाचे उत्तर जनता मतपेटीतून देईल”, असे ते म्हणाले.

शरद पवारांवरील टीकेलाही दिलं प्रत्युत्तर

दरम्यान, राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत बोलताना शरद पवार हे जातीपातीचं राजकारण करतात, अशी टीका केली होती. या टीकेलाही वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं. “राज ठाकरे असो किंवा नितेश राणे, यांची स्क्रिप्ट भाजपाच्या कार्यलयातून जाते. त्यामुळे जातीपातीच राजकारण कोण करतं, हे जनतेला माहिती आहे. मराठ्यांना सत्ता आल्यानंतर ८ दिवसांत आरक्षण देतो हे कुणी सांगितलं? धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो हे कुणी सांगितलं? एसटीच्या कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेतो हे कुणी सांगितलं? हे सर्व लोकांना माहिती आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी राजन विचारे यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. “राजन विचारे हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ठाण्यातील लढाई ही निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी आहे आणि ठाण्यातील जनता कायम निष्ठावंताच्या बाजुने राहिली आहे. आज ज्या प्रकारे ठाण्यातील जनता राजन विचारेंना पाठिंबा देत आहे, त्यावरून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे”, असे ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaibhav naik slams raj thackeray over rally for bjp shinde group in loksabha campaign spb