‘व्हॅलेन्टाइन डे’निमित्त वसई-विरारच्या बाजारपेठांना गुलाबी रंग; विविध वस्तूंनी बाजार सजला

तुमच्या प्रियकर वा प्रेयसीवर तुमचे किती प्रेम आहे, हे सांगणारे ‘प्रेम तपासणी यंत्र’ (लव्ह टेस्टिंग स्टॅण्ड), तुमच्या मनातील भावना जर तुमच्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचवायच्या असतील तर ‘गुप्त संदेश कुपी’(सिक्रेट मेसेज बॉटल) यांसह विविध वस्तूंनी वसई-विरारमधील बाजारपेठा सजल्या आहेत. प्रेमीयुगुलांचा आवडता सण असलेला ‘व्हॅलेन्टाइन्स डे’ काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठांना गुलाबी रंग चढू लागला आहे.

व्हॅलेन्टाइन्स डेनिमित्त दर वर्षीपेक्षा वेगळे आणि हटके असणाऱ्या वस्तू यंदा दुकानदारांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातही ‘सिक्रेट मेसेज बॉटल’ला तरुणाईची अधिक मागणी आहे. आजच्या व्हॉट्सअपच्या काळातही अनेक तरुणांना आपल्या मनातील भावना एकमेकांना समोरासमोर सांगता येत नाही. त्यामुळे खास या सिक्रेट मेसेज बॉटल हा पर्याय उपलब्ध करून दिला असून त्यामध्ये असलेल्या चिठ्ठीवर आपल्या मनातील भावना व्यक्त करता येणार आहेत. या बॉटल ७० ते ५०० रुपयांपर्यंत लहान-मोठय़ा आकारात उपलब्ध करून दिल्या असून त्या खरेदी करण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली आहे. ‘लव्ह टेस्टिंग स्टण्ड’ ही भेटवस्तूही तरुणाईची आकर्षण ठरली आहे. हा स्टॅण्ड म्हणजे एक गंमत आहे. हा स्टॅण्ड हातात पकडल्यास त्यामधील लाल रंगाचे पाणी जितके वर चढेल, तितके प्रेम आपल्या प्रेयसीचे किंवा प्रियकराचे आहे, असे गमतीने म्हणायचे. २०० पासून ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध असणारे आणि दिसण्यास अगदी आकर्षक असल्याने त्यालाही मोठी मागणी असल्याचे वसईतील हॉलमार्क दुकानाचे मालक नरेश पाटील यांनी सांगितले.

यंदा बाजारात लव्ह टेस्टिंग स्टॅण्ड आणि सिक्रेट मेसेज बॉटल, मेसेज कॅप्सूल यांसारख्या अनेक वस्तू यंदा बाजारात आल्या आहेत. आजकालच्या तरुणाईचा कल ज्या गोष्टींमध्ये आहे, अशाच वस्तू आम्ही येथे विकण्यास ठेवत असून त्यांच्या खिशाला परवडेल अशा किमतीमध्येच त्या विकत आहोत.

– नरेश पाटील, दुकानदार

Story img Loader