डोंबिवली: पहलगाम बेसरन पठरावरील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला. या तिन्ही मृत पावलेल्या व्यक्तिंजवळील पिशव्या आणि इतर किंमती ऐवज घटनास्थळीच पडून होता. पहलगाम पोलीस आणि लष्कराने हे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याजवळ पडलेला किमती ऐवज पहलगाम पोलिसांनी ताब्यात घेतला होता. पिशवी, मोबाईल, सोनसाखळी, अंगठी, घड्याळ असा सर्व किंमती ऐवज पहलगाम पोलिसांनी श्रीनगर विमानतळावर डोंबिवलीतील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय निकते यांच्या स्वाधीन केला.
यावेळी शिवसेनेचे डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक संतोष चव्हाण, विवेक खामकर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे आणि स्वीय साहाय्यक अभिजीत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीतील शिवसैनिकांची एक तुकडी डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना साहाय्य आणि त्यांना सुरक्षितपणे डोंबिवलीत आणणे, तिन्ही मृतदेह पहलगाम येथील पोलिसांकडून ताब्यात घेऊन ते सुखरुपपणे डोंबिवलीत आणणे.
मृतांजवळील किमती ऐवज, त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र पहलगाम येथील सिव्हील रुग्णालयातून घेणे या कामासाठी गेली होती. अनपेक्षितपणे हल्ला होण्यापूर्वी हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले यांच्याकडे पर्यटक पिशव्या, त्यांच्या हातात घड्याळ, मोबाईल, गळ्यात सोनसाखळी, हातात अंगठ्या असा किंमती ऐवज होता. या तिघांना दहशतवाद्यांनी मारल्यानंतर त्यांच्या जवळील किंमती ऐवज घटनास्थळीच पडून होता. त्यांचे नातेवाईक स्थानिकांनी केलेल्या सूचनेप्रमाणे दहशतवाद्यांपासून बचावासाठी घटनास्थळावरून पहलगाम येथे परतले होते. घडलेल्या घटनांमुळे तिन्ही मृतांचे कुटुंबीय भेदरले होते. आपल्या घरातील सदस्याला आपल्या समोरच मारल्याने कुटुंबीय सुन्न झाली होती.
हल्ल्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या लष्कर, विशेष पोलीस दलाच्या जवानांनी मृतदेहांजवळ पडलेले सर्व किंमती साहित्य जमा केले. मृतदेहांचा ताबा देताना त्याप्रमाणे ते मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या डोंबिवलीतील शिवसैनिकांच्या ताब्यात दिले. हा किंमती ऐवजाचा ताबा घेत असताना काही क्षण मन हेलावून गेले, असे शिवसैनिक संजय निकते यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत ज्येष्ठ शिवसैनिक संतोष चव्हाण, विवेक खामकर होते. त्या क्षणी आम्ही सुन्न झालो, असे चव्हाण यांनी सांगितले.पहलगाम येथील सिव्हील रुग्णालयाकडून मृतांचे मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आले होते. ते संजय निकते यांनी स्वीकारले.
श्रीनगर विमानतळावर अतिशय संयमितपणे या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या. इंडिगो एअरलाईन्सचा कर्मचारी वर्ग या सगळ्या आव्हानात्मक प्रक्रिया पाहत होत्या. या सगळ्या कामाची दखल घेऊन इंडिगो एअरलाईन्सच्या हवाई सुंदरीने संजय निकते यांना नेटकेपणाने केलेल्या कामाच्या कौतुकाचे पत्र दिले.डोंबिवलीत परतल्यावर संजय निकते, संतोष चव्हाण, विवेक खामकर यांनी अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांच्या जवळ असलेला, पण घटनास्थळी पडलेला, पहलगाम पोलिसांनी ताब्यात घेतलेला किंमती ऐवज लेले, मोने आणि जोशी कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. हा ऐवज स्वीकारताना कुटुंबीय शोकाकुल झाले होते.