बदलापूरः बदलापुरच्या शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या अंगरक्षकाने सहकारी अंगरक्षकाला अडचणीत आणण्यासाठी त्याचे अग्नीशस्त्र चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी जजलाल पांडे या अंगरक्षकाला अटक केली असून त्याच्याकडून अग्नीशस्त्र आणि काडतुसे जप्त केली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव खासगी अंगरक्षक आणि बंदुकधारी रक्षक सोबत ठेवण्याची पद्धत गेल्या काही वर्षात राजकीय वर्तुळात प्रचलित झाली आहे.

बदलापूर शहरातील शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनीही आपल्याकडे खासगी अंगरक्षक ठेवले आहे. यातील एका अंगरक्षकाने दुसऱ्या अंगरक्षकाचे अग्नीशस्त्र चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. वामन म्हात्रे यांच्याकडे मुळचे उत्तर प्रदेश येथील प्रयागराजचे राहणारे जजलाल बुलंद पांडे आणि कृष्णाप्रसाद तिवारी हे दोघेही खासगी अंगरक्षक म्हणून कार्यरत आहेत. या दोघांकडेही परवाना असलेले अग्नीशस्त्र आहे.

यापैकी कृष्णा प्रसाद तिवारी हा १४ मार्च रोजी होळीच्या दिवशी आपले काम संपवून म्हात्रे यांच्या एरंजाड येथील शेतघरावर विश्रांती घेत होता. यावेळी त्याची आठ काडतुसे असलेले अग्नीशस्त्र त्याने जवळच उशाखाली ठेवली होती. काही वेळाने कृष्णा उठून अंघोळीला गेला. मात्र पुन्हा परतल्यानंतर त्याला त्याचे अग्नीशस्त्र आणि मोबाईल दिसले नाही. अग्नीशस्त्र आणि मोबाईल गहाळ झाल्याचे कळता त्याने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना म्हात्रेंचा दुसरा अंगरक्षक जजलाल पांडे याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कृष्णा याला अडचणीत आणण्यासाठी आपण त्याचे अग्नीशस्त्र आणि मोबाईल चोरल्याचे कबूल केले. या प्रकरणी पोलिसांनी जजलाल पांडे याला अटक केली आहे. त्याच्याकडून कृष्णाप्रसाद तिवारी याचे अग्नीशस्त्र, ४ काडतुसे, मोबाईल तसेच जजलाल पांडे याचे अग्नीशस्त्र, १८ जिवंत काडतुसे, ७ रिकाम्या पुंगळ्या आणि मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Story img Loader