डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेतील शिवसेनेेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक वामन सखाराम म्हात्रे यांचे रविवारी रात्री येथे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
१९९५ मध्ये कल्याण डोंबिवली पालिकेत लोकप्रतिनिधी राजवट आली. या काळापासून तीन वेळा ते पालिकेत नगरसेवक, तीन वेळा स्थायी समिती सभापती होते. सभापती असताना विकासाची अनेक कामे मंजूर केली. शिवसेनाप्रमुख, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विश्वासातील एका निष्ठावान शिवसैनिक म्हणून वामन म्हात्रे यांची ओळख होती.
हेही वाचा… कर्जत-कसारा ते सीएसएमटी लोकल १५ मिनीट उशिराने
महापालिकेतील गैरव्यवहारांची अनेक प्रकरणे त्यांनी बाहेर काढून चौकशीच्या फेऱ्यात अडकवली. पालिकेतील जलवाहिनी घोटाळा बाहेर काढून नगरसेवकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकण्यात वामन म्हात्रे यांचा मोलाचा वाटा होता. प्रशासनात त्यांची दहशत होती. सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. शिवसेनेतील कुरघोडीच्या राजकारणामुळे त्यांची महापौर होण्याची संधी दोन वेळा हुकली. पुंडलिक म्हात्रे यांना महापौर करण्यासाठी वामन म्हात्रे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. म्हात्रे यांच्या एक मतामुळे शिवसेनेचा महापौर पदावरील दावा गेला होता. मासळी विक्रेता ते नगरसेवक असा त्यांचा जीवन प्रवास होता.
हेही वाचा… तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालिका अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.