डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर रेसिडेन्ट वेल्फेअर असोसिएशनच्या नियंत्रणाखालील शिळफाटा रस्त्यालगतच्या वंदे मातरम उद्यानास सार्वजनिक उद्यान विभागात नंदनवन सुंदर बाग स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. बालभवन येथील एका कार्यक्रमात मिलापनगर रहिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे पारितोषिक स्वीकारले.कल्याण डोंबिवली पालिका, पर्यावरण दक्षता मंडळ, डोंबिवली इनरव्हिल क्लब पूर्व, पश्चिम आणि डोंबिवली, एनव्हाॅयरो व्हिजील या संस्थांनी या सुंदर बाग स्पर्धेचे आयोजन केले होते.

प्रमाणपत्र, स्मृतिचिन्हे असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. एमआयडीसी निवासी विभागात मिलापनगर भागात शिळफाटा सेवा रस्ता आणि उच्च वीज दाब वाहिन्यांच्याखाली अडगळीची जागा होती. झोपडपट्टीधारक याठिकाणी येऊन दरवर्षी ठाण मांडायचे. ही जागा झोपडपट्टीधारकांनी गिळंकृत करण्याचे नियोजन केले होते. मिलापनगर रेसिडेन्ट वेल्फेअर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही अडगळीची जागा आपण उद्यान म्हणून विकसित करण्याचे ठरवले. एमआयडीसीचे यासाठी सहकार्य घेण्यात आले. मिलापनगर रहिवासी संघटनेच्या सदस्यांनी वर्गणी काढून काही दात्यांनी चांगली देणगी देऊन मागील चार ते पाच वर्षापूर्वी हे उद्यान विकसित करण्यात आले.

या उद्यानात मनोरंजनाची साधने, बाकडे, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्टा, प्राणवायू पार्क आहे. उद्यानात विविध प्रकारची झाडे लावून ती जगविण्यात आली आहेत. उद्यानात पाण्याची व्यवस्था, दिवे, आसनव्यवस्था करण्यात आली आहे. उद्यानात दररोज सकाळ, संध्याकाळ एमआयडीसीसह परिसरातील नागरिक फिरण्यासाठी येतात. ज्येष्ठ नागरिक, वृध्दांचे हे विरंगुळ्याचे ठिकाण आहे.

या उद्यानाचे नियोजन मिलापनगर रहिवासी संघटनेच्या अध्यक्षा वर्षा महाडिक यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारी व्यवस्थापन मंडळ बघते. या उद्यानाच्या दररोजच्या देखभालीचे नियोजन माळी मनोहर सावंत (६९) करतात. उद्यानातील झाडे, फुलझाडे बहरत असल्याने या भागाचे सौंदय वाढले आहे. उद्यानात येणारे नागरिकही उद्यानाची काळजी घेतात. सकाळचे व्यायाम याठिकाणी केले जातात. महिला, पुरूष, तरुण, तरूणी, बालके यांचा येथे राबता असतो.सुंदर उद्यान स्पर्धा जाहीर झाल्यानंतर मिलापनगर रहिवासी संघटनेने या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेच्या परीक्षकांनी वंदे मातरम उद्यानाची पाहणी करून या उद्यानाला तिसऱ्या क्रमांकाचे सुंदर उद्यान स्पर्धेचे पारितोषिक जाहीर केले.

Story img Loader