ठाणे: जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुला – मुलींच्या हर्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेली बोट, फायमोसिस, मान, पोटाची गाठ अशा तब्बल १०० यशस्वी शस्त्रक्रिया एकाच दिवशी मोफत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वागळे इस्टेट येथे दीड वर्षापूर्वी तात्पुरत्या स्वरूपावर जिल्हा रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले. याठिकाणी रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे ६०० ते ७०० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काहीवेळा या रूग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. परंतू, रविवारी लहान मुलांवर विविध शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला. ठाणे पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून सोप्या आणि अवघड अशा दोन्ही प्रकारच्या १०० शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे दोन दिवस अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक रुग्णालयात दाखल झाले होते.  त्यामुळे त्याच्या खाण्या पिण्याची संपूर्ण सोय रुग्णालय प्रशासनाने केली होती. केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ.संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली  मुला मुलींच्या  हर्निया, चरबीची गाठ, डोळ्यांचा तिरळेपणा, फाटलेले ओठ,  हायड्रोसील, फायमोसिस, चिकटलेली बोट, रक्ताची गाठ, मूळव्याध अशा विविध शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.

हेही वाचा >>>गुजरातच्या लबाडांचे लक्ष आता ठाणे, मुंबई महापालिकेवर; शिवसेना नेते विनायक राऊत

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत रुग्णालयात लहान मुला मुलींच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यावेळी काही जोखमीच्या शस्त्रक्रिया देखील यशस्वी पार पडल्या असून, दुर्बिणीद्वारे देखील  शस्त्रक्रिया केल्या आहेत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणे असून मोठ्या कुशलतेने वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत असतात.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे

ठाणे जिल्हा रुग्णालयात चांगल्या शस्त्रक्रिया होतात, हे केवळ ऐकून होतो. मात्र, आज प्रत्यक्ष अनुभवलं आहे. एकाच दिवशी एवढ्या मुलांवर शस्त्रक्रिया बघण्याची पहिलीच वेळ आहे. सरकारी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया पार पडत असतील तर, सर्वांनी सिव्हील रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत.- प्रमिला जाधव, रुग्णाचे नातेवाईक, कल्याण.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various successful surgeries on 100 children in a single day at thane district hospital amy