वसईतून एसटी सेवा कायमस्वरूपी बंद करण्याचे प्रयत्न?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : वसईच्या शहरी भागातून एसटी सेवा बंद झाल्यानंतर आता हळूहळू लांबपल्लय़ाच्या गाडय़ांची सेवाही बंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वसई-अलिबाग ही एसटी सेवा प्रवासी नसल्याचे कारण देत बंद करण्यात आल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.

वसई-विरारमध्ये गेल्या ६० वर्षांपासून एसटी सुरू होती. ग्रामीण भागातील नागरिकांना या एसटीचा मोठा आधार होता. मात्र तोटय़ाचे कारण देत एसटी महामंडळाने शहरी भागातील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला मोठय़ा प्रमाणावर विरोध झाला होता. या विरोधाला न जुमानता १ जानेवारी २०१७ पासून एसटीने २५ मार्गावरील बससेवा बंद केली आहे. शहरी भागातील मार्गावर महापालिकेची परिवहन सेवा सुरू करण्यात आली.

आता मात्र एसटीने ग्रामीण भागातूनही लांबपल्लय़ाच्या एसटीचे मार्ग बंद करण्यास सुरुवात केली आहे. वसईच्या बस आगारातून सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वसई-अलिबागसाठी सुटणारी बस प्रवासी संख्या घटल्याचे कारण देत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अलिबागच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ  लागली आहे. प्रवाशांची संख्या कमी होऊ  लागल्याने ही बससेवा रद्द करण्यात आली असल्याचे बस आगाराच्या नियंत्रण विभागाने सांगितले आहे.

प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ  लागली आहे. सुरुवातीला या बसमधून ६५ ते ७० प्रवासी दररोज प्रवास करायचे, त्यानंतर ही संख्या कमी होऊन ५० ते ५५ वर आली. मात्र गेल्या महिन्यापासून यापेक्षाही कमी प्रवासी संख्या झाल्याने बससाठीचा खर्चही परवडणारा नसल्याने ही सेवा बंद करण्यात आल्याचे वसई बस आगार व्यवस्थापक ठाकरे यांनी सांगितले आहे. जर याला चांगला प्रतिसाद मिळाला, तर ही बससेवा सुरळीत चालू ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. प्रवाशांनी मात्र ही बससेवा अचानक बंद केल्याने संताप व्यक्त केला. प्रवासी कमी झाले हा एसटीचा दावा खोटा आहे, अलिबागला जाणारी बस प्रवाशांनी भरलेली असते, असे प्रवाशांनी सांगितले.

एसटीने आधी शहरी भागातील पालिकेच्या हद्दीतील सेवा बंद केली. आता हळूहळू एक एक मार्ग बंद करण्यास सुरुवात केल्याची  माहिती मी वसईकर अभियानाचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी सांगितले. हे फार मोठे षड्यंत्र आहे. एकत्र एसटी बंद केली तर जनक्षोभ उसळेल, त्यामुळे एकेक मार्ग बंद करून जनतेला गाफील ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

वसई-अलिबागसाठी सुटणारी बस प्रवाशांची संख्या कमी झाली असल्यामुळे बंद करण्यात आली आहे. जर प्रवाशांची संख्या वाढली तर बससेवा पुन्हा सुरू करण्यात येईल. यासाठी प्रवासी संख्याही वाढली पाहिजे.

– अजित गायकवाड, नियंत्रक अधिकारी, एसटी महामंडळ