पुलाच्या स्लॅबची पडझड, प्रवाशांच्या गर्दीने कोसळण्याची भीती
वसई : वसई रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाची दुरवस्था झाली असून, हा पूल प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. या पुलाचे स्लॅब जागोजागी जीर्ण झाले असून सळ्या दिसत आहेत. या पुलावरून प्रवाशांचा प्रवास सुरू असून रेल्वे प्रशासनाचे मात्र दुरवस्थेकडे दुर्लक्ष झाले आहे. हा पूल कोसळला तर मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली.
वसई रेल्वे स्थानाकात पूर्व व पश्चिम तसेच फलाट क्रमांक २, ३ व ४ जोडणारा पादचारी पूल आहे. या पुलावरून मोठय़ा संख्येने प्रवासी ये-जा करतात, तसेच एकाच वेळी दोन्ही ठिकाणच्या फलाटावर जर ट्रेन आली, तर मोठी गर्दी या पादचारी पुलावर होत असते. मात्र हा पूल धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. ‘सध्या हा पादचारी पूल जीर्ण झाला असून कोणत्याही क्षणी हा पूल कोसळू शकतो. यासाठी या पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे, असे प्रवाशांनी सांगितले. या पुलावरील टाकण्यात आलेला स्लॅबही हळूहळू कोसळून खाली पडला असून त्यामध्ये असलेल्या लोखंडी सळ्याही दिसू लागल्या आहेत.
सकाळी व संध्याकाळच्या सुमारास या पादचारी पुलावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. काही दिवसांपूर्वी सीएसएमटी स्थानकात पूल कोसळण्याची घटना घडली होती. या पूल दुर्घटनेनंतरही वसई रोड रेल्वे स्थानकातील धोकादायक पुलाकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कुलदीप वर्तक यांनी केला आहे.
रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम मार्च महिन्यात करण्यात आले आहे. पुढील जे काही दुरुस्तीचे काम आहे ते १० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
– रवींद्र भाकर, जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे