वसई-विरार परिसरात शेकडो प्रकल्प; अन्न आणि औषध प्रशासनाची चाल ढकल

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार : वसई-विरार परिसरात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पाणी पुरवठा करण्यात महापालिका अनेक ठिकाणी तोकडी पडत असल्याने बाटलीबंद पाणी विकणाऱ्यांची चलती आहे. मात्र, ते मिनरल वॉटर म्हणून अशुद्ध पाणी विकत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. महापालिकेने मागील महिन्यात ७ फेब्रुवारी रोजी एका दिवसात ५१ बाटली बंद पाणी प्रकल्पांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत.

लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने पॅकेजिंग मिनरल वॉटरवर त्यांना तहाण भागवावी लागते. पण केवळ अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी, सारेच नियम धाब्यावर बसवून हा शुद्ध पाण्याचा बेकायदेशीर धंदा वसई-विरार परिसरात फोफावत आहे. त्याकडे अन्न आणि औषध प्रशासन, पोलीस आणि पालिका मात्र डोळेझाक करत आहे. पॅकेजिंग मिनरल वाटरच्या नावाखाली सर्रास रसायनयुक्त पाणी विकले जात आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल ५००हून अधिक छोटे-मोठे अनधिकृत प्रकल्प वसई-विरारमध्ये राजरोस सुरू आहेत.

वसई-विरार परिसरातील अनेक चाळी, औद्योगिक वसाहतीत, छोटे गाळे हेरून शुद्ध पाण्याच्या नावाखाली पॅकेजिंग मिनरल वॉटरचे बेकादेशीर प्रकल्प सुरू झाले आहेत. कूपनलिकेचे, टँकरचे, विहिरीचे पाणी फायबरच्या टाकीत टाकून त्यात रसायने टाकून पाणी शुद्ध केले जाते आणि हेच पाणी बाटलीबंद करून आरोचे पाणी म्हणून पॅकेजिंग वॉटरच्या नावाखाली तीस ते पस्तीस रुपये दराने बाजारात विकले जाते.

या स्वच्छ पाण्याच्या प्रकल्पांमध्ये कमालीची अस्वच्छता असते. काही प्रकल्प गटारांच्या बाजूला आहेत. काहींनी पाण्याचे स्रोत शौचालयातून घेतले आहेत, तर काही काही बावखलमधून सरळ पाइप लावून प्रकल्प चालवत आहेत. काही ठिकाणी कपडे धुणे, आंघोळ करणे असे प्रकार नेहमी पाहायला मिळत असल्याने आरोग्याचा प्रश्न अधोरेखित होत आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या कंपन्यांना दर्शनीय भागावर कुठेही फलक नाही. आय.एस.आय.चे माकॅ नाही, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचा (बीआयएस) कोड नाही, तसेच अन्न व औषध विभागाची परवानगी नाही मात्र, केवळ पाणी शुद्ध असल्याचे भासवून मिनरल वाटरच्या नावाखाली पाण्यावर गोरख धंदा करणाऱ्या शेकडो कंपन्या वसई, विरार, नालासोपारा परिसरात कार्यरत आहेत.

अधिकाऱ्यांना गौडबंगालाची माहिती

या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी दिलेली माहिती ही अतिशय खळबळजनक आहे. या विभागाने सांगितले की, वसई-विरारमध्ये केवळ ३० ते ४० प्रकल्पांना परवाने दिली आहे. परंतु, प्रत्यक्षात ५००हून अधिक प्रकल्प सुरू आहेत.

अनेक वेळा आम्ही अन्न व औषध प्रशासन विभागाकडे या पाणी प्रकल्पांबाबत तक्रारी करत आहोत. मात्र ते या तक्रारींकडे कानाडोळा करतात. सध्या वसई-विरार परिसरात ५००हून अधिक असे प्रकल्प सुरू आहेत.

– अपूर्वा दोषी, मुख्य सहायक, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पॅकेजिंग ड्रिंकिंग वॉटर असोसिएशन  

वसई-विरार महापालिकेने या सर्व प्रकल्पांना नोटीस दिल्या आहेत. त्यातील काहींवर गुन्हेसुद्धा दाखल केले आहेत. जे प्रकल्प सुरू आहेत त्यातील पाण्याचे नमुने तपासणी अहवाल आम्ही मागविले आहेत. पण खरी कारवाई ही अन्न व औषध प्रशासनाकडून अपेक्षित आहे.

– नीलेश जाधव, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वसई-विरार महानगरपालिका.

पोलीस गुन्हे दाखल करीत आहे. पण प्रकल्प सील करण्याची कारवाई ही अन्न व औषध प्रशासनाकडून अपेक्षित आहे. आम्ही पालिका आणि अन्न व औषध प्रशासन दोघांनाही या संदर्भात माहिती दिली आहे.

– विजयकांत सागर, पोलीस उपअधीक्षक, वसई

Story img Loader