अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या ना त्या कारणाने सरकारी पैशांची उधळपट्टी होण्याच्या घटना नवीन नाहीत. मात्र, वसई-विरार महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने स्वत:चा वैयक्तिक खटला लढवण्यासाठी पालिकेच्या पैशाचा उपयोग केल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
गुरुनाथ कापडी हे आय प्रभागाचे अनधिकृत बांधकाम नियंत्रक असून सध्या पालिकेच्या डॉ. डीएम पेटिट रुग्णालयाचे प्रमुखसुद्धा आहेत. त्यांच्यावर माहिती अधिकार कार्यकर्ते संजय कदम यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आणि अंगावर धावून गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कदम यांनी कापडी यांच्यावर वसई न्यायालयात वसई न्यायालयात फौजदारी आणि नुकसानभरपाईचा दिवाणी खटला भरला आहे. त्याची सुनावणी सध्या वसई न्यायालयात सुरू आहे. या फौजदारी खटल्यामध्ये (९१३४/२०१३) पान ३वर)
आणि नुकसानभरपाई दावा (३५०/१४) मध्ये केलेल्या रिव्हिजन क्रमांक ४५/१४ मध्ये पालिकेच्या वतीने कापडी यांना वकील देण्यात आलेला आहे. या वकिलाचा खर्च पालिका करत आहे. ‘कापडी यांच्याविरोधात मी दाखल केलेले खटले हे वैयक्तिक असून तो वाद खासगी कामासाठी आलेला असताना झालेला होता. त्याच पालिकेच्या कामाशी काहीही संबंध नाही,’ असा आरोप कदम यांनी केला आहे. तरीसुद्धा साहाय्यक प्रभाग आयुक्त स्मिता भोईर यांनी अधिकाराचा गैरवापर करून नियमबाहय़ पद्धतीने हा वकील दिल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे. कदम यांनी या प्रकरणी भोईर यांनाही नोटीस बजावली आहे. तसेच स्मिता भोईर, गुरुनाथ कापडी तसेच इतर सर्व संबंधितांविरोधात कलम १२० (ब), ४०३, ४०५, ४०६, ४०८ नुसार कारवाई करण्याची मागणी कदम यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे. याबाबत कापडी यांना विचारले असता मी पालिकेच्या कामासाठी आलो तेव्हा हा वाद झाला. मग तो माझा वैयक्तिक खटला कसा असू शकतो, असा सवाल त्यांनी केला. याबाबत अधिक माहिती साहाय्यक आयुक्तांकडूनच घ्या, असेही ते म्हणाले.
काय होते प्रकरण?
’माहिती अधिकार कार्यकर्ता संजय कदम यांनी बेकायदा बांधकामाविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यावरून कापडी आणि कदम यांच्यात वाद निर्माण झाला होता.
’२२ ऑगस्ट २०१३ रोजी गुरुनाथ कापडी हे वसई तहसील कार्यालयात आले होते. त्या वेळी तेथे उपस्थित असणाऱ्या संजय कदम यांच्याशी त्यांचा वाद झाला.
’कापडी यांनी शिवीगाळ करत अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत कदम यांनी त्यांच्याविरोधात वसई पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
’ कापडी हे तहसील कार्यालयात वैयक्तिक कामासाठी आले होते, असा कदम यांचा दावा आहे.