वसई-विरार परिवहन उपक्रमाला महिनाभरात ६६ हजारांचा नफा
वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला पहिल्याच महिन्यात ६६ हजार रुपयांचा नफा झाला. कंत्राटदारांमार्फत चाललेली परिवहन सेवा मधल्या काळात जवळपास डबघाईस आली होती. बस वारंवार बंद पडणे, फेऱ्या पूर्ण न होणे, वेळापत्रकातील अनियमितता, अशा प्रकारांमुळे ही सेवा भविष्यात तग धरून राहील की नाही, अशी शंका प्रवाशांच्या मनात होती; मात्र ही सेवा महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली आल्यानंतर फायद्यात आल्याने प्रवाशांना सुखद धक्का बसला आहे.
जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानाच्या माध्यमातून मिळालेल्या ९० बसगाडय़ा पालिकेने स्वत:कडे चालवायला घेतल्या. यासाठी मे. के.आर.सोनावणे अॅण्ड सन्स या कंत्राटदाराकडून बसचालक, वाहक, तिकीट तपासनीस आणि प्रवर्तक ठेका पद्धतीने घेतले. पहिल्या टप्प्यात २५ बसगाडय़ा पालिकेला मिळाल्या. ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण करण्यात आले. सुरुवातीला सहा बस सर्वाधिक प्रवासी असलेल्या उत्तन मार्गावर सुरू करण्यात आल्या. त्यानंतर विविध आठ मार्गावर १७ गाडय़ा सध्या धावत आहेत.
मध्यंतरी ज्येष्ठ नागरिक व विद्यर्थ्यांना बस भाडय़ात देण्यात येणारी सवलत बंद करण्यात आली होती. ही सवलत पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. लवकरच बस आणि बसथांबे यांच्यावर जाहिरातींचे कंत्राट देऊन सेवेचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
बसगाडय़ा पालिकेच्या, फायदाही पालिकेचा
वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला पहिल्याच महिन्यात ६६ हजार रुपयांचा नफा झाला.
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 17-12-2015 at 03:49 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar municipality earn 66 thousand from public transport