वसंत डावखरे यांच्या विधानाने राजकीय चर्चा जोरात
ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून घेण्यात येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती वसंत डावखरे बुधवारी कार्यक्रमानिमीत्त एकाच व्यासपिठावर अवतरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या वतीन उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात हे दोघे नेते एकत्र आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डावखरे यांनी ‘मी ठाकरे कुटुंबाचा हितचिंतक आहे’ असे सूचक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या आठ जागांचा कार्यकाळ येत्या जून महिन्यात संपणार आहे. ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेतून वसंत डावखरे गेली काही वर्षे सलग निवडून येत आहे. सहा वर्षांपुर्वी तर शिवसेनेने ऐनवेळेस आपल्या उमेदवारास माघार घेण्याचे आदेश देऊन डावखरे यांचा निवडून येण्याचा मार्ग मोकळा केला होता. मातोश्री आणि डावखरे यांच्यातील सौहार्दाची चर्चा तशी नवी नाही. तरीही विधानसभेपाठोपाठ जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे गणित यंदा बदलल्याने ही निवडणूक डावखरेंसाठी सोपी नाही अशीच चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे.
या पाश्र्वभूमीवर बदलापूरात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात डावखरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवित शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीतील विजयासाठी आवश्यक असलेले मतांचे गणित डावखरे यांच्या बाजूने नसले तरी शिवसेनेसोबत असलेली जवळीक त्यांच्या पथ्यावर पडेल, अशी चर्चा या भेटीनिमीत्ताने पुन्हा एकदा सुरु झाली आहे. दरम्यान, ‘ मी जिंकण्यासाठीच निवडणुकीला उभा राहतो, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे’, असा दावा डावखरे यांनी या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केला. उद्धव ठाकरे आणि मी एकमेकांचे हितचिंतक आहोत. त्यामुळे मला निवडणूकीची चिंता नाही, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले. तुम्ही पहा निवडणुकीचा निकाल निश्चितच सकारात्मक असेल, असेही ते म्हणाले.