घरात पामचं झाड होतं. कुरतडलेलं पान दिसलं की मी काढून टाकायची. त्या दिवशी फुलपाखरू पानावर येऊन बसलं. त्याचं बूड जरा जास्त वेळ टिकल्यामुळे, मी चटकन् कॅमेरा आणून त्यात त्याला बंदिस्त केलं. जरा ‘झूम’ करून पाहिलं तर बेटय़ाने खसखशीएवढं अंड घातलं होतं. त्यावरची नक्षी बघून तर मी बेहद्द खूश झाले. फुलपाखरू होईपर्यंतच ‘त्या’ अंडय़ाचे बाळंतपण मी सजगतेने टिपलं. अळी मोठ्ठी हुश्शार, पान एका बाजूला दुमडून स्वत:च्या स्रावाने चिकटवून लपण्यासाठी जागा तिने तयार केली होती. शत्रू पक्षाचा वास लागला की लगेच लपायची..’
प्राणीजगताविषयी भरभरून बोलणाऱ्या वेदवती पडवळचा कॅमेराही तितक्याच सहजतेने आणि चपळतेने समोरील दृश्य टिपतो. मग ते झाडाच्या कुरतडलेल्या पानावर बसलेलं फुलपाखरू असो की मुंगी आणि कोळीमधील टोळीयुद्ध. वेदवतीच्या कॅमेऱ्याची नजर या सूक्ष्म घडामोडीही अचूकपणे टिपते आणि त्यातून निर्माण होणारे छायाचित्र एक वेगळीच अनुभूती देते.
ठाण्याच्या सरस्वती मंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत असल्यापासून वेदवतीला चित्रकलेची मनस्वी आवड. रंगरेषांमधील सौंदर्याची जाण असणाऱ्या वेदवतीने शालेय जीवनांत राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत अनेक पुरस्कार मिळवलेच. शिवाय देशाच्या सीमा ओलांडून अमेरिका व जपान येथील कलाप्रदर्शनात तिची चित्रे प्रदर्शित झालेली आहेत. साहजिकच जे. जे. स्कूल ऑफ आर्टची वाट तिला अगदी सहज गवसली. एका ‘अनुभवी’ सल्ल्यानुसार रंगरेषांचे विभ्रम कागदावर चितारण्याची संधी देणाऱ्या फाइन आर्टऐवजी कमर्शिअल आर्टकडे वेदवतीने मोर्चा वळवला. छायाचित्रण हा खास विषय घेऊन कमर्शिअल आर्टची पदवी २००६ मध्ये तिने मिळवली.
बी.एम.सी.मध्ये इंजिनीअर असलेले वडील विलास पडवळ व पारायणाचे कार्यक्रम करणाऱ्या विद्या पडवळ यांनी लेकीला ठाण्यात घराजवळ नामदेववाडीसमोर स्टुडिओ थाटून दिला. मॉडेल पोर्टफोलिओ, फॅशन शूट, प्रॉडक्ट शूट, कमर्शिअल शूटने वेदवतीच्या स्टुडिओतली वर्तुळं वाढू लागली. फॅशन इंडस्ट्रीकडे तिने पाठ फिरवली. टिपिकल वेडिंग फोटोग्राफी तिला रुचत नव्हती; परंतु विविध हालचालींतून नेमके ‘भाव’ टिपणारी चेहऱ्यापेक्षाही कृतीवर फोकस करणारी क्रिएटिव्ह वेंडिंग फोटोग्राफी, कॅण्डिडकडे वेदवतीने आपली ‘नजर’ वाळवली आणि तिचा करिअर ग्राफ उंचावू लागला.
या व्यावसायिक यशाच्या हातात हात घालून वेदवतीने जंगल भ्रमंतीतून वन्य पशू-पक्षी कीटकांच्या छायाचित्रणाचा छंदही जोपासला. पदवी आणि कॅमेरा हातात आल्यावर युवराज गुर्जर यांच्या ग्रुपबरोबर ती तिच्या आईसोबत कासला गेली. असंख्य चित्रचौकटी ती क्लिक करू लागली. त्याच नादात ती दर रविवारी येऊरच्या जंगलात भटकंती करू लागली. निसर्ग रोज अनंतहस्ते लुटतच असतो, त्यातूनच एखाद्या क्षणी मर्मबंधातली ठेव ‘क्लिक’ होते.
ताडोबाच्या जंगलात पाच-सहाजण १५-२० फुटावरून वाघिणीवर लक्ष ठेवून होते, पण तिचे ‘शू’ करतानाचे, म्हणजे सेंट मार्किंग करतानाचे छायाचित्रण फक्त वेदवतीला मिळाले, यातच तिची कला दिसून येते. या छायाचित्राला पुरस्कारही मिळाला. सुज्ञ गेंडा एकाच ठिकाणी परत परत येऊन विष्ठा करतो. वास घेऊन उलटा वळून तो विष्ठा करायला आणि वेदवतीने ‘ती’ टिपायला एकच गाठ पडली. अर्थात विष्ठेमुळे छायाचित्र खराब झाले नाही तर उलट बऱ्याच आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले. लहान बाळाच्या पोर्टफोलिओप्रमाणे बांधवगडच्या जंगलात २००८मध्ये सव्वा वर्षांच्या वाघाच्या पिल्लाचा तिच्या लाडक्या कल्लूचा रुबाबदार ‘वाघ’ होईपर्यंतचा प्रवास छायांकित करण्यासाठी वेदवती सलग दोन-तीन वर्षे, वर्षांतून दोनदा ‘कल्लू’ची भेट घेत होती. कुठंही फिरायला गेलं तरी तिथल्या जंगलात जाण्याचा वेदवतीचा हट्ट आईबाबा आनंदाने पुरवतात.
वन्यप्राण्यांच्या जीवनातले ‘नाटय़’ समयसूचकतेने छायाचित्रित करण्यात वेदवतीची नजर आणि हात कुशल आहेत. त्यामुळेच ‘ऑल इंडिया कॉम्पिटिशन ऑफ फोटोग्राफी’, ‘द एप्सॉन इंटरनॅशनल फोटोग्राफिक पॅनो अॅवॉर्ड्स’ अशा अनेक वेचक आणि वेधक पुरस्कारांनी वेदवती कौतुकपात्र ठरत आहे. युरोप खंडात २४ मेला नॅशनल पार्क डेला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनात सलग सात वर्षे री्रुं येथे तिची छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत. ‘मराठी माया.कॉम’ या मासिकाचे मुखपृष्ठ तसेच ‘मुंबईची फुलपाखरे’ या पुस्तकात वेदवतीची छायाचित्रं आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा