पोटभर आणि चमचमीत खाल्ल्यानंतर खवय्ये नेहमीच ताजेतवाने होतात आणि त्यांच्यामध्ये काम करण्यासाठी उत्साह निर्माण होतो. त्यात पिझ्झा, बर्गर,गार्लिक ब्रेड, हॉट डॉग आणि फ्रॅ न्की आदी चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर मन प्रसन्न झाले नाही तरच नवल. काही ब्रॅन्डेड पिझ्झा लोकप्रिय आहेत. ते खाण्यासाठी बरेच लोक गर्दी करतात, खातात आणि विसरून जातात. कारण त्याची चव एकसारखी असते. त्यामुळे वेगळ्या चवीच्या शोधात खवय्ये असतात. डोंबिवली पूर्व येथील रिफ्रेश कट्टा हा तरुणांचा आवडीचा कट्टा झाला आहे. येथील हॉटडॉग तसेच गार्लिक ब्रेड या पदार्थानी चवीने खाणाऱ्या डोंबिवलीकरांची मन जिंकून घेतली आहेत.
मराठमोळ्या पदार्थासोबतच पंजाबी, दाक्षिणात्य इतकेच नव्हे तर चायनीज, इटालियन या पदार्थानी खवय्यांना खाण्याचे वेड लावले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खवैय्ये नेहमीच चविष्ट पदार्थाच्या शोधात असतात. त्यामुळे गल्लीबोळातील एखादे छोटसे आणि चविष्ट खाद्यपदार्थाचे दुकानही खवय्ये शोधून काढतात आणि मग त्या पदार्थाची चव घेण्यासाठी कट्टय़ावरील मित्र-मैत्रिणींनासुद्धा घेऊन जातात. त्यानंतर त्या दुकानातील खाद्यपदार्थाची महती सर्वदूर पसरते. त्याचप्रमाणे रिफ्रेश कट्टा अगदी युवकांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वानाच हवाहवासा वाटणारा आहे. येथील फ्रॅन्की तसेच चमचमीत पदार्थ खाण्यासाठी आजी-आजोबाही आवर्जून गर्दी करतात. ब्रॅन्डेड चवीला त्याची सर येत नाही. शिवाय त्याला अधिक पैसेही मोजावे लागतात. मात्र प्रतीक क्षीरसागर याच्या रिफ्रेश कट्टय़ावरील पिझ्झा खाताना आपलेपणा वाटतो तसेच हा पिझ्झा स्वस्त आणि पौष्टिकही आहे. कोबी, कांदा तसेच अनेक भाज्या प्रतीक पिझ्झामध्ये वापरतो. त्यामुळे मुलांना पौष्टिक खायला मिळते असे येथे जमलेले खवय्ये आवर्जून सांगतात. भिक्षुकी करताना प्रतीकला काहीतरी खाद्य पदार्थाचा कट्टा सुरू करण्याची संकल्पना सुचली आणि सुरुवातीच्या काळात त्याने फ्रॅन्की बनवून त्याची विक्री सुरू केली. त्यानंतर त्याने पिझ्झा तयार करण्याचा निर्णय घेतला. ग्राहकांनी त्याला खूपच चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर प्रतीकने बर्गर, गार्लिक ब्रेडची पाककला शिकून घेतली आणि खवय्यांना आपलेसे केले. ज्याचे पोट तृप्त असेल, तो नेहमीच आशीर्वाद देतो. त्यामुळे खवय्यांना प्रसन्न करण्याचे ध्येय उराशी बाळगून चार वर्षांपूर्वी त्याने हा कट्टा सुरू केला. पदार्थ बनविताना चांगले तेल वापरणे, तसेच जिथे पदार्थ तयार केला जातो त्या जागेची स्वच्छता राखणे आदी गोष्टींची दक्षता येथे आवर्जून घेतली जाते.
लाल मिरच्या, बारीक चिरलेला लसून, आले पेस्ट,कांदा, पाती कांदा ,व्हिनेगार, कॉर्नफ्लॉवर आदी जिन्नस एकत्र करून शेजवान सॉस तयार केला जातो. हा सॉस दररोज सकाळी घरी तयार करून आणला जातो. प्रतिदिन ६-७ किलो शेजवान सॉस सहज संपतो असे प्रतीकने सांगितले. या शेजवान सॉसचीच चव पदार्थाला येते आणि पदार्थ अधिक रुचकर लागतो. रिफ्रेश कट्टा सायंकाळीच सुरू असला तरीही दरदिवशी प्रत्येकी पाच किलो कांदा, कोबी आणि इतर भाज्या आणाव्या लागतात. तसेच फ्रॅन्कीचेही २० प्रकार त्याच्याकडे उपलब्ध आहेत. गरमागरम रोटी, त्यावर उकडलेला बटाटा आणि शेजवान सॉस व इतर जिन्नसाने बनलेली ही चमचमीत फ्रॅन्की खाताना ‘प्रतीक अजून एक दे’ असे डोंबिवलीकर आवर्जून सांगतात. पूर्वी डोंबिवलीमध्ये फ्रॅन्की हा प्रकार मिळत नसे. मात्र या रिफ्रेश कट्टय़ाच्या फ्रॅन्कीमुळे डोंबिवलीकारांना फ्रन्कीची चव चाखता येत आहे. चार वर्षांत फ्रॅन्कीची चव काही बदलली नाही असे ग्राहकांनीही आवर्जून सांगितले आहे. त्यामुळे फडके रोडला फेरफटका मारून झाला की डोंबिवलीकरांना या ठिकाणी येण्याचा मोह आवरत नाही. पनीर फ्रॅन्की, मेयॉनीज फ्रॅन्की ग्राहक अधिक पसंत करतात. तसेच हॉट डॉग या ब्रेडच्या नवीन प्रकारालाही ग्राहकांकडून सर्वात जास्त पसंती आहे असे प्रतीकने सांगितले. यामध्येही चीज हॉटडॉग आणि व्हेज हॉटडॉग आदी पदार्थ मिळतात. विशेष म्हणजे रिफ्रेश कट्टय़ावर तयार होणारे पदार्थ स्वत: प्रतीक तयार करतो. यामध्ये पिझ्झा आणि बर्गरच्या आकारानुसार या पदार्थाची किंमत ठरलेली आले. २० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत पिझ्झा खावयास मिळतो. काळाप्रमाणे मित्र-मैत्रिणीची पसंत बदलत जाते आणि आजी-आजोबांना मात्र चवीत बदल झालेला फारसा आवडत नाही. मध्यवयीन खैवय्ये दोन्ही खाणे पसंत करतात. या सर्वाची खाण्याची पसंत लक्षात घेऊनच पदार्थ तयार केले जातात. चमचमीत आणि चटपटीत खाण्याला कधीच बंधन नसते. त्यामुळे खाणाऱ्याने खात राहावे खावे अन् खिलावावे या उक्तीचा रिफ्रेश कट्टय़ावर अनुभव येत असतो.
इतकेच नव्हे तर ज्यांचा उपवास आहे, अशांसाठी त्याने फ्रेंचफ्राईजचीही व्यवस्था रिफ्रेश कट्टय़ावर केली आहे. बटाटय़ापासून बनवलेले हे फ्रेंचफ्राईजही ग्राहकांना गरम देण्याकडेच प्रतीकचा कल असतो. नावाप्रमाणे रिफ्रेश करणारा हा कट्टा खवय्यांना रिफ्रेश करतो आणि नवीन पदार्थाची चव चाखायला पुन्हा पुन्हा आमंत्रणच देत असतो असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही.

* कुठे- गणेश मंदिराजवळ, फडके रोड, डोंबिवली (पूर्व)
* वेळ- सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत

Story img Loader