कल्याण : पावसाळ्यात ठराविक कालावधीत येणाऱ्या रानभाज्यांच्या पाककृतीचा उत्सव कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. औषधी गुणधर्म असलेल्या या भाज्यांची प्रत्येकाला ओळख व्हावी. या भाज्यांच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या आदिवासी दुर्गम भागातील रहिवाशांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या विचारातून हा उपक्रम आयोजित केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोवेली गावातील जीवनदीप महाविद्यालयातील ६० विद्यार्थी, विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाले होते. आताच्या झटपट चटपटीत हातगाड्यांवरील पाश्चात्य पदार्थांच्या खाद्य पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या नवीन पीढीला जंगलात पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांची ओळख व्हावी. या भाजांमधून शरीराला मिळणारी पौष्टिक खनिजे याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या विचारातून हा उपक्रम आयोजित केला होता, असे जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : मुंबई-ठाण्यात जोरदार पाऊस, पश्चिम उपनगरात जोर वाढला

जून मध्ये पाऊस सुरू झाल्यापासून ते सप्टेंबरपर्यंत जंगलात विविध प्रकारच्या रानभाज्या उगवतात. या भाज्या हाच यापूर्वी ग्रामीण, आदिवासी समाजातील भोजनात महत्वाचा घटक होता. विद्यार्थिंनींनी शेवळाचा रस्सा, टाकळ्याची भाजी, आंबट बिंदुकली, कोळू, लोथ, कुड्याची फुले, अळू, वळीचे कांद, भोकर, भोवरा, कोराळ, सुक्या मोदुड्या, अंबाडी, चायवाल या रानभाज्यांच्या पाककृती तयार केल्या होत्या.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रोजच्या ४०० रुपयांच्या मजुरीमुळे भातशेतीकडे पाठ

या पाककृती स्पर्धेत सानिका देवकर हीने प्रथम, मानसी मगर हिने व्दितीय, काजल धुमाळ हिने तिसरा क्रमांक पटकावला. मुलींमध्ये अंकिता कोर, संजना बोतकुंडले, संचिता मलिक यांनी तर, मुलांमध्ये मानस तारमळे, चेतन वाडगे, क्रिश भोईर यांनी अनुक्रमे प्रथम ते तिसरा क्रमांक पटकावला. यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डोंबिवलीतील प्रसिध्द खवय्या राहुल चौधरी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. यावेळी प्राचार्य डाॅ. के. बी. कोरे, प्राचार्य प्रकाश रोहणे, प्रा. स्नेहा भोंडविले, प्रा. नरेश टेंभे, प्रा. पी. एच. पाटील उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetable cooking festival at jeevandeep college in kalyan ysh
Show comments