बाजार म्हणजे काय असतो. तेथे भाजीपाल्याची कशी विक्री केली जाते. बाजारातील पैशांचे व्यवहार कसे होतात. ग्राहकाला भाजीची विक्री कशा पध्दतीने करायची, याची माहिती अभ्यासा बरोबर शालेय जीवनापासून असावी या विचारातून येथील टिळकनगर बालक मंदिर शाळेत किलबिल भाजी मंडईचा उपक्रम राबविण्यात आला.
हेही वाचा >>>कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात पाणीटंचाई; एमआयडीसीने दुरुस्तीसाठी ठेवला पाणी पुरवठा बंद
बालवर्गातील मुले, त्यांचे पालक या उपक्रमात सहभागी झाले होते. बालगोपाळ विदयार्थी आपल्या पालकांसोबत बसून वांगी, मुळा, मेथी, गाजर, गवार, पालक, भेंडी, आले, मिरची, लिंबू असा विविध प्रकारचा भाजीपाला विकत होते. भाज्यांची ओळख मुलांना व्हावी हाही यामागील उद्देश होता. शाळेतील पालक, शिक्षक या विद्यार्थ्यांकडून भाजी खरेदी करत होते. भाजीची किंमत, ती ग्राहकाला कशी विकावी याची माहिती पालक आपल्या पाल्यांना करून देत होते. किलबिल भाजी मंडईत लहान मुले भाजी घ्या भाजी स्वस्त भाजी, ताजी ताजी भाजी अशी आरोळी ठोकून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार पाहून पालक, ग्राहक म्हणून आलेल्या पालक, शिक्षकांची हसून मुरकुंडी वळत होती. बाजारातील वातावरण शाळेच्या आवारात निर्माण करण्यात आले होते.
हेही वाचा >>>बदलापूरः फेरिवाल्यांचे अतिक्रमण आणि अग्नीशमन दल वेठीस, फेरिवाल्यांच्या गाड्यांना कंटाळून नागरिकांचे कृत्य
अभ्यासात केवळ बाजाराचे चित्र पाहून विद्यार्थ्यांना समजून सांगण्यापेक्षा प्रात्यक्षिकासह बाजार काय असतो हे या उपक्रमातून दाखवून देण्यात आले, असे टिळकनगर बालक मंदिर शाळेच्या शिक्षकांनी सांगितले. बालक मंदिराच्या प्रमुख स्वाती कुळकर्णी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची आखणी करण्यात आली होती.