मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने सर्वच भाज्यांचे दर चढणीला

टोमॅटो, कांदा या रोजच्या आहारातील भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासे झाले असतानाच आता अन्य भाज्यांचे दरही चढणीला लागले आहेत. राज्यातील बागायती पट्टय़ात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा मागमूस नसल्याने भाज्यांची आवक रोडावू लागली आहे. त्यातच श्रावण महिना असल्यामुळे भाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होऊ लागल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर वाढले आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसराला पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून भाज्यांचा पुरवठा होत असला तरी मराठवाडा, विदर्भ या पट्टय़ातूनही काही भाज्या मुंबईत येत असतात. कोकण पट्टय़ाचा अपवाद वगळला तर राज्यातील उर्वरित जिल्ह्य़ांमध्ये अजूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे आकडेवारी सांगते. याचा परिणाम भाज्यांच्या उत्पादनावर जाणवू लागला आहे. ऐन श्रावणात भाज्या महाग होऊ लागल्याने सामान्यांच्या खिशावर ताण येऊ लागला आहे.

कांदा, टोमॅटोचे दर वाढले असताना गेल्या आठवडाभरापासून फ्लॉवर, कोबी, भेंडी, वांगी यासारख्या प्रमुख भाज्यांनी किरकोळ बाजारात अर्धशतक ओलांडले आहे. घाऊक बाजारात या भाज्यांचे दर ३० ते ४० रुपयांपर्यंत पोहचले आहेत, अशी माहिती वाशी घाऊक बाजारातील व्यापारी गोपीनाथ मालुसरे यांनी दिली. एरवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाशी बाजारात दिवसाला ५०० ते ६०० वाहनांची आवक होत असते. कल्याण घाऊक बाजारात हेच प्रमाण १५० ते २०० वाहनांच्या घरात असते. गेल्या काही दिवसांपासून या बाजारांमध्ये भाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढू लागले आहेत. कल्याण बाजारात शहापूर, मुरबाड भागातील शेतांमधील भाजीचा पुरवठा होत असतो. हा पुरवठा काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शामकांत चौधरी यांनी दिली.

टोमॅटो, कांदा महागच

पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर, नारायणगाव तसेच गुजरात आणि कर्नाटक राज्यातून टोमॅटोची होणारी आवक घटल्याने किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ७०-८० किलो पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवडय़ापासून कांद्याचे दरही वाढले आहेत. घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा कांदा २५ रुपयांनी विकला जात असल्याने किरकोळीत हे दर चाळिशीच्या घरात आहेत.

 

भाज्या                           घाऊक        किरकोळ

कांदा                                 २४               ४०

टोमॅटो                             ४०-५०            ८०

फ्लॉवर                             २०                ६०

कोबी                               १२                 ६०

वांगी                               २०-३०           ६०

शि.मिरची                      ३०-३५            ८०

सुरण                              ३०                 ६०

तोंडली                           ३०-४०            ६०

(दर रुपये प्रति किलो)

Story img Loader