मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांना भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या वाशीतील घाऊक बाजारपेठेत मागील दोन दिवसांपासून आवक कमालीची वाढल्याने पालेभाज्यांचे दर झपाटय़ाने उतरू लागले आहेत. मात्र त्याच वेळी फोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या लसणाने किलोमागे शंभर रुपयांचा दर गाठला असून मिरचीचे दरही ९० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. दुसरीकडे, किरकोळ बाजारात टोमॅटोचे दरही आठवडय़ाभरात किलोमागे १८-२० रुपयांनी वाढले आहेत. 

मागील आठवडय़ात २२ ते २५ रुपये किलो या दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे दर घाऊक बाजारात २० रुपयांपर्यंत स्थिरावले आहेत. किरकोळ बाजारात मात्र टोमॅटो अजूनही महाग दराने विकला जात आहे. सोमवारी डोंबिवली शहरात उत्तम दर्जाचा टोमॅटो ५० रुपये किलो, तर ठाण्यातील गोखरे रस्त्यावरील बाजारात ३४-३८ रुपये किलो दराने विकला जात होता. दुसरीकडे, घाऊक बाजारात लसूण ७० रुपये किलोवर पोहोचली असून हेच दर किरकोळ बाजारात १२०-१४० रुपयांच्या आसपास आहेत. राजस्थान, उटी परिसरात अवेळी पाऊस झाल्याने लसणाची आवक घटली आहे, अशी माहिती कांदा-बटाटा आडत व्यापारी संघाचे पदाधिकारी चंद्रकांत रामाणे यांनी दिली.
दरम्यान, घाऊक बाजारात चांगल्या प्रतीची मिरची ३६ रुपये किलोने विकली जात असताना किरकोळ बाजारात मात्र ती ८०-९० रुपये किलोने विकली जात आहे. त्याचप्रमाणे भेंडी (५० रुपये), गव्हार (५० रुपये) यांसारख्या भाज्या घाऊक बाजारात महाग झाल्या आहेत. किरकोळ बाजारात भेंडी- ८० रुपये, गव्हार- ७५ रुपये, तोंडली- ७० रुपये अशा भाज्या चढय़ा दराने विकल्या जाऊ लागल्या आहेत.

आवक वाढल्याने भाज्या स्वस्त
पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून वाशीच्या भाजीपाला बाजारात मंगळवारी दिवसभरात ५५० गाडय़ांची आवक झाली. वाटाणा, मेथी, पालक, कोथिंबीर अशा ठरावीक भाज्यांची आवक वाढू लागल्याने त्यांच्या किमती घसरत आहेत, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली. मागील आठवडय़ात ३४ रुपये किलो अशा दराने विकला जाणारा वाटाणा मंगळवारी २७ रुपयांपर्यंत खाली घसरला. याशिवाय मेथी (६ रुपये), कोिथबीर (३ रुपये) अशा पालेभाज्यांच्या किमतीही घसरू लागल्या आहेत.

Story img Loader