भाग्यश्री प्रधान
आठवडाभरात किरकोळ दरांत १० ते १५ रुपयांची वाढ
पावसाची माघार आणि उन्हाच्या वाढत्या झळा यामुळे भाजीपिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या दरांनी उसळी घेतली आहे. कोथिंबीर, पालक, मेथी, लाल माठ या पालेभाज्यांच्या दरांत जुडीमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात ही दरवाढ अधिक प्रभावीपणे जाणवत असून आठवडय़ापूर्वी २५ रुपयांना मिळणारी कोथिंबिरीची जुडी आता ३५ ते ४० रुपयांना मिळत आहे. पाच ते सात रुपयांची पालकची जुडीही आता १५ ते २० रुपयांना विकली जात आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसरांत प्राधान्याने जुन्नर, लातूर, पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून पालेभाज्यांची आवक होत असते. या भागात सुरुवातीला उत्तम पाऊस झाला. मात्र ऑगस्ट महिन्याच्या मध्यंतरात पावसाने विश्रांती घेतल्याने येथील पालेभाज्यांच्या उत्पादनावर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे या काळात शेतात पालेभाज्या करपण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे, अशी माहिती जुन्नरचे शेतकरी गणेश हांडे यांनी दिली. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरांत होणारी पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. बुधवारी कल्याण कृषी बाजार समिती येथे पालेभाज्यांच्या फक्त ५ गाडय़ांची आयात झाल्याची माहिती कल्याण कृषी समितीचे शामकांत चौधरी यांनी दिली. गेल्या आठवडय़ापर्यंत १० ते १२ गाडय़ांची आवक होत असल्याची माहिती कल्याण कृषी समितीचे अधिकारी यशवंत पाटील यांनी दिली.
दोन आठवडय़ांपूर्वी घाऊक बाजारात कोथिंबीरचे भाव १५ रुपये होते. त्यानंतर हे भाव हळूहळू वाढत जाऊन सध्या घाऊक बाजारात कोंथिंबीर २० ते २५ रुपये जुडीप्रमाणे विकली जात आहे, तर घाऊक बाजारात ९ रुपयांनी विकली जाणारी मेथी सध्या ३० रुपये जुडी याप्रमाणे विकली जात आहे. घाऊक बाजारात १५ रुपये जुडीने विकला जाणारा मुळा सध्या २५ रुपये जुडीने विकला जात आहे.
‘‘सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने पालेभाज्यांची आवक चांगली होती. मात्र, नंतर अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने व तापमानात वाढ झाल्याने पालेभाजीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. पालेभाजीच्या दर्जावरही याचा परिणाम झाला आहे,’’ अशी माहिती ठाण्यातील बाजारातील किरकोळ विक्रेते दर्शन म्हात्रे यांनी दिली, तर वातावरणात गारवा आल्यानंतर साधारणत: दिवाळीच्या दरम्यान या पालेभाज्यांचे भाव स्थिर होतील, असा अंदाज कल्याण कृषी समितीचे सचिव शामकांत चौधरी यांनी वर्तवला.