सर्वच भाज्या २० ते ३० रुपयांनी महागल्या; फरसबी, गवार १२० रुपये प्रतिकिलो
ठाणे : वाढत्या तापमानाचे चटके भाज्यांच्या उत्पादनाला आणि पर्यायाने ग्राहकांना बसू लागले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसराला होणारा भाज्यांचा पुरवठा घटल्याने सर्वच भाज्यांचे किरकोळ बाजारातील दर किलोमागे २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत. भेंडी, कोथिंबीर, फरसबी, वाटाणा आणि गवारच्या भावात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात ३० रुपये किलोने उपलब्ध असलेला हिरवा वाटाणा किरकोळ बाजारात हंगाम नसल्याचे सांगत १०० रुपये किलोने विकला जात आहे.
गेल्या आठवडय़ात किरकोळ बाजारात ८० रुपये किलो दराने गवाराची विक्री होत होती. आता हेच दर १२० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात भेंडीची विक्री ८० ते १०० रुपये किलो दराने होत असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली. फरसबीची विक्री आठवडाभरापूर्वी ७० ते ८० रुपये किलो दराने होत होती. आता ग्राहकांना १२० रुपये किलो दराने फरसबी विकत घ्यावी लागत आहे. घाऊक बाजारात १२ रुपयांना मिळणारा फ्लॉवर किरकोळ बाजारात ६० रुपये किलोने विकला जात आहे. शेवग्याच्या शेंगा, बीट आणि काकडीचे भाव किरकोळ बाजारात १० ते २० रुपयांनी वधारले आहेत. करडई, कांद्याची पात, शेपू आणि मेथीचे दर १० ते २० रुपये प्रति जुडी वाढले आहेत.
किरकोळ बाजारात ४० रुपयांना विकला जाणारा फणस आता ६० रुपयांवर पोहोचला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवडय़ाभरापूर्वी भाज्यांच्या १७५ गाडय़ा येत होत्या. मात्र दोन दिवसांपासून १४० ते १५० गाडय़ा दाखल होत असल्याची माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र घोडविंदे यांनी दिली.
नाशिक, पुणे येथून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या भाज्यांच्या गाडय़ांचे प्रमाण कमी झाले आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते.
– रवींद्र घोडविंदे, संचालक, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती
पांढरा कांदा स्वस्त
उन्हाळ्यात लाल कांद्यासह पांढरा कांदा बाजारात दाखल झाला असून त्याला मोठी मागणी आहे. यंदा पांढऱ्या कांद्याचे उत्पादन अधिक झाले असून दरात गतवर्षीच्या तुलनेत किलोमागे १० ते १५ रुपयांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी ५० ते ६० रुपये किलोने विकला जाणारा हा कांदा यंदा ३० ते ४० रुपयांना उपलब्ध आहे. अलिबाग, वसई आणि भिवंडीत या कांद्याचे उत्पादन अधिक होते. उन्हाळ्यात थंड आणि औषधी गुणधर्म असलेल्या पांढऱ्या कांद्याला ग्राहकांकडून मोठी मागणी असते; परंतु मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली येथील किरकोळ बाजारात पांढरा कांदा ३० ते ४० रुपये किलोने विकला जात असल्याचे किरकोळ भाजी विक्रेत्यांनी सांगितले.
नाशिक, पुण्यातून भाज्या कल्याण, वाशीत येतात. उन्हाळा सुरू झाल्याने पाणीटंचाई उद्भवली आहे, त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. साधारण तीन ते चार महिने दर चढेच राहणार आहेत. भाज्यांना पर्याय म्हणून नागरिक कडधान्ये खरेदी करत आहेत. – भगवान तुपे, किरकोळ भाजी विक्रेते
भाज्यांचे दर (रु./किलो)
भाजी घाऊक किरकोळ
भेंडी ४४ ८०
कोथिंबीर ३० ५०
फरसबी ६० १२०
वाटाणा ३० १००
पडवळ ४५ ८०
गवार ६० १२०
निवृत्त आदर्श शिक्षकांच्या अशा रकमा कापल्या आहेत का, याची माहिती नाही. अशा नस्ती आपणापर्यंत येत नाहीत. उपमुख्य लेखापालाच्या माध्यमातून अशा नस्तींचा निपटारा केला जातो.
– गीता नागर, मुख्य लेखा अधिकारी, जि. प. ठाणे