एका भामट्या रिक्षा चालकाने एका भाजी विक्रेत्याला मी तुमचा खूप ओळखीचा आहे असे दाखविले. तुम्हाला घरी सोडतो असे सांगून भाजी विक्रेत्याला भुरळ घालून त्याच्या हातामधील पिशवीतील १० हजारा रुपयांची रोख रक्कम लुटून पसार झाला.ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजता डोंबिवली पूर्वेतील मानव कल्याण केंद्रा समोरील गल्लीत घडली. अशोक खिलारी (५५) हे भाजी विक्रेते टिळकनगर मधील ध्वनी सोसायटीत राहतात. अशोक खिलारी बुधवारी दुपारी भाजी विक्रीचा व्यवसाय करुन दुपारी भोजनासाठी घरी चालले होते. यावेळी त्यांच्या हातात भाजी विक्रीतून मिळालेले आणि त्यांच्या जवळील असे एकूण १० हजार रुपये होते. ते त्यांनी एका पिशवीत ठेवले होते. ते पायी घरी चालले असताना मानव कल्याण केंद्रा समोरील गल्लीतून जात असताना एका अनोळखी भामट्या रिक्षा चालकाने अशोक यांना हाक मारुन ‘काय कसे आहात. अनेक दिवस तुम्ही दिसला नाहीत.

हेही वाचा >>> उल्हासनगर : इमारतीचा स्लॅब कोसळून चार मृत्युमुखी ; कॅम्प पाच भागातील घटना, बचावकार्य सुरू

मी तुम्हाला घरी सोडतो’ अशी ओळख दाखविली. रिक्षा चालक आपणास ओळखत असावा असा विचार करुन अशोक रिक्षा चालकाशी बोलत असताना रिक्षा चालकाने अशोक यांना बोलण्यात गुंतवून त्यांना भुरळ घालून त्यांच्या हातामधील पिशवीतील पैशांची पिशवी अलगद काढून घेतली. आणि अशोक यांना गुंगारा देऊन घटनास्थळा वरुन पळून गेला. रिक्षा चालक पळून गेल्यानंतर अशोक यांना रिक्षा चालक भामटा होता. त्यांनी आपली फसवणूक केली असल्याचे लक्षात आले. त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.मानव कल्याण केंद्रा समोरील गल्लीतून टिळक रस्त्यावरुन ब्राम्हण सभा दिशेने आणि स्टेट बँक दिशेने पळता येते. त्यामुळे बहुतांशी भुरटे चोर या गल्लीच्या दोन्ही बाजुला उभे राहून नागरिकांची फसवणूक करत असतात.