नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर; स्वतंत्र भाजीबाजाराच्या मागणीकडे दुर्लक्ष

तलासरी शहरात अनेक भाजीविक्रेत्यांनी जागेअभावी भाजीची दुकाने गटारावर थाटली आहेत. दुर्गंधी आणि अस्वच्छ असलेल्या परिसरात भाजीविक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरात स्वतंत्र भाजीबाजार असावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून भाजीविक्रेत्यांकडून केली जाते, मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरण यांमुळे तलासरीची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. शहर विस्तारीकरणास जागे अभावी मर्यादा पडत आहे. शहरात स्वतंत्र भाजीबाजार नसल्याने अनेक भाजीविक्रेत्यांनी शहरातील गटाराच्या बाजूलाच भाजीविक्रीची दुकाने थाटली आहे. चांगल्या आरोग्यासाठी नेहमी हिरव्या पालेभाज्या खाव्यात, असे आहारतज्ज्ञ आवर्जून सांगतात. परंतु अशा दुकानांमधील पालेभाज्या खाऊन आरोग्य चांगले कसे राहणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. शहरात भाजीबाजारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी भाजीविक्रेत्यांनी केली होती. मात्र अद्याप या मागणीची पूर्तता झाली नाही.

सध्या भाजीबाजारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नाही. आम्ही जागेचा शोध घेत असून लवकरात लवकर जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी भाजीबाजार उभा केला जाईल.

– सागर साळुंखे, मुख्याधिकारी, तलासरी नगरपरिषद

शहरात सध्या स्वतंत्र भाजी बाजार नसल्याने आम्हाला ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल, त्या ठिकाणी भाजीचे दुकान लावतो. प्रशासनाने स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली तर आम्ही गटाराजवळ दुकान थाटणार नाही.

– दत्तू शिवदे, भाजी विक्रेते