खाद्यधर्म हाच आद्यधर्म असल्याचे नेहमीच बोलले जाते. त्यामुळे अस्सल खवय्ये नेहमीच जिभेचे चोचले पुरवून घेण्यासाठी सदैव तयार असतात. मांसाहार करणारे खवय्ये नेहमीच मांसाहाराचे कौतुक करतात. मात्र काही दिवशी त्यांना आचारसंहिता पाळून शाकाहार पाळावा लागतो. सोमवार, गुरुवार, शनिवार अथवा महिन्याच्या संकष्टीला उपवास करीत नसले तरी अनेक जण सामिष आहार टाळतात. मात्र अशा दिवशी काहीतरी चमचमीत आणि झणझणीत खाऊन ते मांसाहाराची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करीत असतात. दुसरे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात पचायला जड असणाऱ्या मांसाहारापेक्षा शाकाहारी खाणे कधीही श्रेयकर असते. अशाप्रकारच्या शाकाहारी पण मांसाहारसदृश चमचमीत नाश्त्यासाठी खवय्ये हल्ली ठाण्यात गोखले रोडवरील ‘कॅफे विशाला’ येथे गर्दी करतात.
सॅन्डविच हा तर अगदी सहजपणे सर्वत्र उपलब्ध होणारा खाद्यप्रकार आहे. ‘कॅफे विशाला’मध्ये मात्र हे सॅन्डविच कोबी तसेच अनेक फळभाज्या वापरून तयार केले जाते. यामुळे जी मुले भाज्या खात नाहीत, त्यांच्या पोटात आपोआप सॅन्डविचच्या माध्यमातून हे पौष्टिक पदार्थ जातात. खास त्यासाठीच हे सॅन्डविच आम्ही तयार करीत असल्याची माहिती ‘कॅफेविशाला’चे मालक अनिल सूर्यवंशी यांनी दिली. या सॅन्डविचमध्ये घरी बनवलेली चटणी तसेच सॉस आदी जिन्नस वापरल्याने हे मोगलाई सॅन्डविच अतिशय चविष्ट लागते. त्याचप्रमाणे मसाला ग्रील आणि मेयोनीज सॅन्डविचलाही खवय्ये पसंती दर्शवतात. त्याचबरोबर लोणी स्पंज डोसा यालाही खवय्ये पसंती देतात. स्पंज डोसा अर्थातच स्पंजसारखा मऊ आणि लोण्यासारखा हलका असतो. त्यामुळे याचे नाव लोणी स्पंज डोसा असल्याचे अनिल सूर्यवंशी सांगतात. या डोश्याला द्रावणगिरी डोसा असेही संबोधले जाते. या डोशाबरोबर मसाला डोसा तसेच साधा डोसाही त्यांच्याकडे मिळतो. उपवास असेल तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण ‘कॅफेविशाला’मध्ये उपवासासाठी साबुदाणा वडाही मिळतो. तसेच रोज, बटरस्कॉच, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, केसर आदी मिल्कशेकमुळे आलेल्या खवैय्यांना गरमीच्या दिवसात थंडाव्याचा दिलासा मिळतो. त्याचप्रमाणे कोकम सरबत विथ पुदिना असेही पेय उन्हाळ्याच्या दिवसात येथे मिळते. विशेष म्हणजे या सर्वच खाद्यपदार्थाची किंमत ३० ते ८० रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे ‘कॅफे विशाला’मध्ये स्वस्तात भरपेट खावयास मिळते, असे येथे आलेले तरुण हामखास सांगतात. तसेच कोल्ड कॉफी पिता पिता गप्पा मारण्याचा आनंदही लुटता येतो आणि मैत्री घट्ट होण्यास मदत होते.
‘कॅफे विशाला’मध्ये मिळणारा खिमा-पाव म्हणजे मांसाहारी लोकांना शाकाहारीमध्ये मिळणारी पर्वणीच. कारण हा व्हेज खिमा-पाव कोल्हापुरी चटपटीत व नॉनव्हेजची पुरेपूर चव पुरवणारा आहे. यामध्ये चांगल्या प्रतीचे मसाले वापरले जातात. तसेच उत्तम तेल वापरून खवय्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते. अगदी अल्पावधीतच हा खिमा-पाव ठाणेकर खवैय्यांच्या पसंतीस उतरला आहे. एकमेकांच्या शिफारशीने त्याची कीर्ती द्विगुणीत होत आहे. या खिमा-पावमध्ये गाजर, फ्लॉवरऐवजी सोयाबीनसारख्या भाज्या वापरल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. सोयाबीन हे शाकाहारी मटण मानले जाते. त्यामुळे अर्थातच त्याची चव हुबेहूब मांसाहारी खिम्यासारखी लागते. अर्थातच ‘कॅफे विशाला’मध्ये शाकाहारी खिमा खायला येणाऱ्यांची बहुसंख्या आहे. तसेच उपवास नसला तरी रुचीपालट म्हणून साबुदाणे वडे खायला येणारेही बरेच लोक आहेत. त्याचप्रमाणे दिवसाला ४-५ किलो दाबेलीची भाजी संपते. हे पदार्थ खवय्यांना ताजे आणि गरमागरम मिळावे यासाठी अनिल आणि किशोर सूर्यवंशी सतत प्रयत्नशील असतात. किशोर सूर्यवंशी यांना स्वत:ला खाण्याची बरीच आवड आहे. त्यामुळेच त्यांनी हा व्यवसाय पत्करला. सुरुवातीला त्यांनी घोडबंदर रोड येथे अशा प्रकारचे दुकान चालविले. तिथे खवय्यांना आपले पदार्थ आवडताहेत हे लक्षात आल्यावर गोखले रोड येथे त्यांनी स्वत:चे दुकान सुरू केले. चटपटीत नाश्त्याचे हे दुकान कधीही बंद नसते. त्यामुळे ठाणेकरांना दररोज हे ताजे पदार्थ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे येथील कोणत्याही खाद्यपदार्थात कृत्रिम रंग अथवा तत्सम खवय्यांच्या आरोग्यास बाधक असे कोणतेही घटक वापरले जात नाहीत, असे सूर्यवंशी यांनी आवर्जून सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधी – सकाळी ११ ते रात्री १० वाजता
कुठे- कॅफे विशाला, वीर बाजीप्रभू देशपांडे मार्ग, कलानिधीसमोर, गोखले रोड, ठाणे</strong>

कधी – सकाळी ११ ते रात्री १० वाजता
कुठे- कॅफे विशाला, वीर बाजीप्रभू देशपांडे मार्ग, कलानिधीसमोर, गोखले रोड, ठाणे</strong>