डोंबिवली – डोंबिवली पूर्वेत टिळकनगर रस्ता आणि आगरकर रस्तादरम्यानच्या गल्लीतील ब्राह्मण सभेलगतची पालिका शाळेजवळील वाहतुकीला अडसर ठरणारी भिंत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काढून टाकली. त्यामुळे या सर्वाधिक वर्दळीच्या गल्लीत होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे.

टिळकनगर रस्ता ते आगरकर रस्त्या दरम्यानची गल्ली ही मधला रस्ता म्हणून प्रत्येक वाहन चालक वापरतो. या रस्त्याने पेंडेसनगर, सावरकर रस्ता, सारस्वती काॅलनी भागातील वाहन चालक येऊन ते आगरकर सभागृह येथून मानपाडा रस्ता, डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक किंवा इच्छित स्थळी जातात. मानपाडा रस्त्याकडून येणारी वाहने सावरकर रस्ता, पेंडेसनगरमध्ये जाण्यासाठी ब्राह्मण सभेजवळील गल्लीचा वापर करतात. या गल्लीमध्ये अनेक वर्षापासून महावितरणचे एक रोहीत्र होते. या रोहित्राला संरक्षित करण्यासाठी एक भिंत बांधण्यात आली होती. गेल्या वर्षी या गल्लीचे सीमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यावेळी रोहीत्र महावितरणने हटविले. रोहित्राची जागा सोडून ठेकेदाराने काँक्रिटीकरण केले. तेथे जीवंत वीज वाहिन्या होत्या. टिळकनगर ते आगरकर रस्ता दरम्यानचा ६० फुटाचा रस्ता पालिकेला रस्ता रूंदीकरण किंवा काँक्रिटीकरणाचा करता आला नाही. जीवंत वीज वाहिन्यांचा नागरिकांना धोका म्हणून त्या लगतची रस्त्यामधील भिंत महावितरणने कायम ठेवली होती.

सुयोग हाॅल भागात संध्याकाळी नेहमी वाहतूक कोंडी होते. या कोंडीत अडकण्यापेक्षा वाहन चालक आगरकर रस्ता ते टिळकनगर रस्त्या दरम्यानच्या ब्राह्मण सभा जवळील गल्लीचा वापर करतात. अलीकडे या रस्त्यावरील वाहन संख्या वाढली होती. या वाहनांना महावितरणच्या रोहित्रा जवळच्या संरक्षित भिंतीचा अडथळा येत होता. रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, चारचाकी वाहने या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहने धावत होती. त्यामुळे या गल्लीतील रस्त्यावर वाहन चालक अर्धा ते एक तास अडकून पडत होते. ही भिंत काढून टाकावी म्हणून अनेक नागरिकांची मागणी होती. लोकसत्ताने या विषयाची गंभीर दखल घेऊन वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित ठिकाणच्या जीवंत वीज वाहिन्यांची योग्य तजवीज करून वाहनांना अडथळा ठरणारी भिंत काढून टाकण्याची मागणी केली होती. महावितरण अधिकाऱ्यांनी रोहीत्र काढून नेल्यानंंतर रिकाम्या झालेल्या जागेतील जीवंत वीज वाहिन्या सुस्थितीत करून वाहनांना अडथळा ठरणारी भिंत काढून टाकली आहे. पालिकेने या गल्लीतील रखडलेल्या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यासाठी संबंधितांना कळविण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Story img Loader