विनापरवाना मोटारसायकलवरून रस्त्यावर चौखूर उधळणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लगाम घालण्यासाठी त्यांच्या ओळखपत्रावर महाविद्यालयांनी वाहन परवाना नमूद करण्याबाबतचा प्रस्ताव ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठाणे जिल्ह्य़ातील काही महाविद्यालयीन व्यवस्थापनांपुढे ठेवला आहे. दुचाकीस्वार विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश देताना त्यांचे ओळखपत्र आणि त्यावरील वाहन परवाना क्रमांक तपासला जावा, या हेतूने ही योजना आखली आहे.
महाविद्यालयीन दशेतील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी नियमितपणे वाहन वापरत असतात. मात्र, यापैकी अनेकांकडे वाहन परवाना नसतो. अशा मुलामुलींना वाहतूक नियमांचेही भान रहात नाही. शिवाय, भरधाव वेगाने गाडी चालवणे, दुचाकीवरून साहसी कसरती करणे, गाडय़ांच्या शर्यती लावणे, असे प्रकारही मोठय़ा महाविद्यालयांच्या परिसरात होत असतात. या पाश्र्वभूमीवर ठाणे परिसरातील महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांनी वाहन चालविणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांच्या कक्षेत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी नवा प्रस्ताव तयार केला आहे.
ठाणे येथील के बी पी महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर वाहन परवाना क्रमांक नोंद करण्यात यावा, असा प्रस्ताव ठाणे परिवहन प्राधिकरणामार्फत पहिल्यांदा महाविद्यालयापुढे ठेवण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याची की नाही, याचे सर्वस्वी अधिकार महाविद्यालय प्रशासनाला असणार आहेत, अशी माहिती ठाण्याच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.
कशासाठी?
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय वाहन परवाना देण्याआधी वाहतूक नियमांविषयी परीक्षा घेते आणि त्यानंतर वाहन परवाना देऊ करते. मात्र, वाहन परवाना नसलेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयी फारशी माहिती नसते. यामुळे त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. प्रसंगी अशा विद्यार्थ्यांच्या बेफिकिरीने अपघातही होतात.