लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण: घराजवळ, सार्वजनिक रस्त्यावर उभ्या करुन ठेवण्यात आलेल्या दुचाकी चोरुन नेण्याचे प्रमाण कल्याण, डोंबिवलीत वाढले आहे. महागड्या चारचाकी वाहनांचे टायर चोरुन नेण्यात येत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे वाहन मालक हैराण आहेत.

बहुतांशी वाहन मालक हे नोकरदार, व्यावसायिक आहेत. सकाळी कामावर जाण्यासाठी ही वाहने वाहन मालक वापरतात. वाहनेच चोरीला गेल्याने वाहन मालकांची कोंडी झाली आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात वाहन मालकांनी तक्रारी केल्या आहेत.

डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव वेताळनगर भागात राहणारे संजय कोळी यांची दुचाकी कोपर रस्त्यावरील ओम साई गॅरेज येथून चोरट्यांनी रात्रीच्या वेळेत चोरुन नेली. ५० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेल्याने कोळी यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हेही वाचा… कळवा रुग्णालयातील मृत्यूंच्या चौकशीचा दहा दिवसात अहवाल सादर करा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चौकशी समितीला आदेश

नांदवली गावदेवी भागात राहणारे धर्मेंद्रकुमार यादव यांचा मित्र सचीन निरभवणे यांच्या मालकीची दुचाकी फडके रस्त्यावरील बाबासाहेब जोशी पथावरील गल्लीत उभी करुन ठेवण्यात आली होती. चोरट्याने ती चोरुन नेल्याची तक्रार यादव यांनी रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे.

हेही वाचा… आजार निमोनियाचा आणि उपचार अर्धांगवायुचे कळवा रुग्णालयातील प्रकार; मनसेने उघडकीस आणला प्रकार

कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्ता भागात राहणारे प्रवीण पटेल यांनी आपली मोटार सायकल कल्याण पश्चिेतील श्री देवी रुग्णालया समोरील मोकळ्या जागेत उभी करुन ठेवली होती. अज्ञात इसमाने ती चोरुन नेली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. आजदे गावात राहणारे मंगेश सुभेदार यांची शेव्हरलेट कार कावेरी चौकात उभी करुन ठेवण्यात आली होती. या वाहनाचे चहु बाजुचे टायर चोरट्याने काढून चोरुन नेले आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicle owners are in trouble by increasing incidents of vehicle theft in dombivli kalyan dvr