कल्याण डोंबिवली परिसरात रस्त्यावर, सोसायटी आवारात उभ्या केलेल्या दुचाकी, रिक्षा चोरणाऱ्या एका नऊ जणांच्या टोळीला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ दुचाकी, एक रिक्षा आणि मोटारी, दुचाकीमधील विजेऱ्या जप्त केल्या आहेत.

कल्याण, डोंबिवली परिसरात गेल्या दोन महिन्यात सुमारे २० हून अधिक दुचाकी, १० रिक्षा चोरीला गेल्या आहेत. दररोज वाहन चोरीचे दोन ते तीन गुन्हे कल्याण डोंबिवली हद्दीत घडत आहेत. बहुतांशी दुचाकी नोकरदार, व्यावसायिक यांच्या असल्याने त्यांची कामाच्या ठिकाणी जाण्याची मोठी अडचण झाली आहे.

या वाहन मालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. वाहन चोरीच्या घटना दररोज कल्याण परिसरात घडत असल्याने उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी स्थानिक पोलिसांना विशेष तपास पथके तयार करुन वाहने चोरणाऱ्या टोळीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या घटना घडल्या होत्या. अशाच एका वाहन चोरीचा तपास करत असताना कोळसेवाडी पोलिसांना एक दुचाकी स्वार संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला थांबवून वाहनाची कागदपत्र मागितली. त्याने टंगळमंगळ करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वरिष्ठ निरीक्षक बशीर शेख यांच्या समोर उभे केले. त्याने वाहन चोरी करत असल्याची कबुली दिली.

पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे यांनी दुचाकी स्वाराची कसून चौकशी केली. तेव्हा त्याच्या सांगण्यावरुन एकूण नऊ दुचाकी स्वारांना पोलिसांनी साखळी पध्दतीने अटक केली. एकाला अटक केल्यानंतर तो दोन ते तीन जणांची नावे सांगत होता. अशाप्रकारे नऊ जणांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्या कडून नऊ दुचाकी, एक रिक्षा, वाहनांमधील विजेऱ्या जप्त केल्या आहेत. एकूण वाहने सात ते आठ लाख रुपये किमतीची आहेत. चोरीची वाहने विक्री करुन मौज मजा करायची असे या तरुणांचे नियोजन होते. कामधंदा नसल्याने ते चोरी करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

या तरुणांच्या अटकेतून गेल्या अनेक महिन्यापासून कल्याण, डोंबिवलीतील अनेक दुचाकी, रिक्षा चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशिर शेख यांनी वर्तवली.

अटक तरुण
भावेश कुंड, आकाश महार, जतीन अजेंद्र, ऋषी ॲन्थोनी, मितेश पंडित, अविनाश चिकणो, सतीश लोंढे, गणेश ससाणे, मंगेश डोंगरे.

Story img Loader