ठाणे, पालघर, जळगाव जिल्ह्यांच्या हद्दीत वाहने चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला टिटवाळा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून चारचाकी, दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. त्याच्यावर पालघर, ठाणे, जळगाव जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सोनुसिंग जगजितसिंग उर्फ सुरजीतसिंग बावरी (२४, रा. खिसमतराव चाळ, गणेशवाडी, टिटवाळा पूर्व, मूळ रा. तांबापुरा, शिरसोली नाका, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. टिटवाळा पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या एका चारचाकी वाहनाचा शोध घेत असताना सोनुसिंग पोलिसांच्या तावडीत सापडला.
हेही वाचा >>>“गुंडांकडून आमच्यावर हल्ले करता, हेच तुमचं हिंदुत्व”, शिवसेनेचा शिंदे गटाला सवाल; म्हणाले, “अंगावर यायचे तर…”
पोलिसांनी सांगितले, टिटवाळा येथे राहणाऱ्या एका नागरिकाचे चारचाकी वाहन काही दिवसापूर्वी इंदिरानगर भागातून रात्रीच्या वेळेत चोरीस गेले होते. वाहन मालकाने परिसरात आपल्या वाहनाचा शोध घेतला. त्यांना वाहन आढळले नाही. वाहन चोरीला गेले म्हणून वाहन मालकाने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली.
हेही वाचा >>>कल्याण मध्ये रिक्षा चालकाला बेदम मारहाण
टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकुर यांनी या वाहनाचा शोध घेण्यासाठी साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे, हवालदार दर्शन सावळे, राहुल बागुल, नंदलाल परदेशी, योगेश वाघेरे, धनंजय गुजर यांचे तपास पथक तयार केले. या पथकाने टिटवाळा इंदिरनगर भागातून चोरीस गेलेले वाहन ज्या भागात ठेवले होते. त्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यात त्यांना एका कारमधून काही इसम कार चोरण्यासाठी आले होते. त्यांनी तेथील वाहनाला दोरखंड बांधले आणि दोरखंडचे दुसरे टोक स्वतःच्या वाहनाला बांधले. त्यानंतर वाहन दोरखंडच्या साहाय्याने स्वतःच्या वाहनासोबत खेचत नेल्याचे दिसले. वाहन क्रमांकावरुन पोलिसांनी या वाहनाच्या मालकाचा शोध घेतला. त्याने आपण सदरची कार पालघऱ् येथील कुंदनसिंग उर्फ कुलदीपसिंग यांना विकली असल्याचे सांगितले. या कारचा चालक कुलदीपसिंगचा मेहुणा सोनुसिंग बावरी असल्याचे आणि तो टिटवाळा गणेशवाडी भागात राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी टिटवाळ्यात सोनुसिंगचा तपास केला. पोलीस आपल्या मागावर आहे हे समजताच पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने सोनुसिंगला अटक केली.
सोनुसिंगने साथीदारांच्या साहाय्याने इंदिरानगरमधून कार चोरल्याची कबुली दिली. तसेच ठाणे, पालघऱ्, जळगाव भागातून दुचाकी चोरल्याची माहिती दिली. पोलिसांनी चोरीची तिन्ही वाहने सोनुसिंगकडून जप्त केली आहेत. सोनुसिंगवर जळगाव मधील एमआयडीसी, रामानंद, पेठ पोलीस ठाणे, विरार, टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सोनुसिंगने आणखी काही चोरीचे गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली घाटे, उप विभागीय अधिकारी राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही अटकेची कारवाई करण्यात आली.