कल्याण – बुधवारी सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या अनेक सखल भागात पाणी साचले. या पाण्यामुळे वाहने संथगतीने धावत आहेत. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावर जागोजागी वाहन कोंडी असल्याचे चित्र आहे.
सोनारपाडा, काटई, पलावा चौक परिसर, देसई, खिडकाळी आणि शिळफाटा दिशेने रस्त्याच्या अनेक भागात पावसाचे पाणी तुंबले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारांची तोंडे लहान आणि पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पाणी रस्त्यावर साचले आहे. तसेच रस्ता दुभाजकामुळे अनेक ठिकाणी पाणी अडून राहते. हे पाणी रस्त्यालगतचे पाणी वाहून जात नाही तोपर्यंत कमी होत नसल्याने वाहन चालकांना या पाण्यातून कमी वेगाने वाहने न्यावी लागली.
हेही वाचा – कल्याणमध्ये गुंतवणूकदारांची ३० लाखांची फसवणूक
या संथगती वाहनांमुळे शिळफाटा रस्त्यावर दोन्ही बाजूने अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावसामुळे संध्याकाळी वाहतूक कोंडी आणि पुराच्या पाण्यात अडकायला नको म्हणून कार्यालयातून दुपारी चार वाजता बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला. बहुतांशी नोकरदार मुंब्रा, शिळफाटा रस्त्यावर भाड्याच्या, आपल्या खासगी वाहनांमध्ये तुंबलेल्या पावसामुळे खोळंबून राहिले होते.
हेही वाचा – मुंब्रा बाह्यवळण मार्गावर दरड कोसळली
डोंबिवली रेल्वे स्थानक
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, पाटकर रस्ता, डाॅ. राॅथ रस्ता भागातून नाला गेला आहे. या नाल्याची पुनर्बांधणी केली नाही. पाण्याचा प्रवाह अधिक आणि अरुंद नाला त्यामुळे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात नेहमी पाणी तुंबते. बुधवारी सकाळपासून या भागातील अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढत रेल्वे स्थानकात जावे लागले.