लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील पश्चिमेतील रेल्वे मैदानाजवळील गणेश भागातील एक रस्ता काँक्रीट कामासाठी पालिकेच्या ठेकेदाराने बुधवारी अचानक खोदून ठेवला. सर्वाधिक वर्दळीचा रस्ता अचानक खोदल्याने शहराच्या विविध भागातून आलेली वाहने खोदलेल्या रस्ता भागात संध्याकाळी सात वाजल्यापासून अडकून पडली आहेत.
हा रस्ता खोदताना पालिका अभियंते, ठेकेदारांनी डोंबिवली वाहतूक विभागाला पूर्व कल्पना देणे आवश्यक होते. तसे नियोजन न केल्याने बुधवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजून गेल्यानंतरही गणेशनगर, सुभाष रस्ता, गरीबाचापाडा रस्ता, कुंभारखाणपाडा रस्ता, अंतर्गत गल्लीबोळ वाहनांनी गजबजून गेले आहेत. कामावरून परतणारा नोकरदार या वाहन कोंडीत अडकून पडला आहे.
आणखी वाचा-ठाणे : सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या
गणेशनगर मधील विष्णुनगर पोलीस चौकीजवळ २० फुटाचा अरूंद रस्ता आहे. या रस्त्याची १० फुटाची एक बाजू काँक्रीट कामासाठी ठेकेदाराने बुधवारी खोदली. त्यामुळे उरलेल्या एकाच मार्गिकेतून येणारी जाणारी वाहने धाऊ लागली. या रस्त्यावर एकावेळी अवजड वाहने समोरासमोर आल्याने सात वाजल्यापासून सर्व वाहने या कोंडीत अडकून पडली. वाहतूक विभागाचे कर्मचारी सात वाजल्यापासून या भागात वाहतूक नियोजनाचे काम करत आहेत. कोंडी सोडविताना त्यांची दमछाक झाली आहे. दुचाकी, मोटार चालकांनी गणेशनगर रस्त्याच्या आजुबाजुच्या अंतर्गत रस्त्यांमध्ये वाहने घुसवून इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न केला. या गल्ल्यांमध्ये दोन्ही बाजुने वाहने आल्याने या गल्ल्या कोंडीत अडकल्या आहेत.
वाहतूक विभागाने गणेशनगर रेल्वे मैदान रस्ता पूर्ण होईपर्यंत या भागातून एकेरी वाहतुकीसाठी परवानगी द्यावी, अन्यथा या भागात दररोज अभूतपूर्व वाहन कोंडी होईल, अशी भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.