लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : कल्याण जवळील पत्रीपुल येथे एक अवजड बॉयलवर वाहू वाहनाचा पुलर रविवारी पहाटे उलटला. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर हा पुलर उलटल्याने पत्रीपुलासह परिसरातील रस्त्यांवरील वाहने जागीच अडकून पडली. रविवारी सकाळी पर्यटनासाठी निघालेले कल्याण, भिवंडी परिसरातील पर्यटक या कोंडीत अडकले. तीन तास या रस्त्यावरील वाहतूक प्रभावित झाली होती.
पत्रीपुलाच्या जवळ मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर पुलर उलटल्याने कल्याणकडून शिळफाटाकडे जाणारी, शिळफाटाकडून कल्याणकडे येणारी, डोंबिवलीतून पत्रीपूल मार्गे भिवंडीकडे जाणारी वाहने या रस्त्यावर अडकून पडली. ही घटना समजताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बॉयलरवाहू वाहनाचा अवजड पुलर हटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पत्रीपुलावर धावणऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या.
आणखी वाचा-कल्याणमध्ये तलवार हातात घेऊन हल्लेखोराचा तरूणाला मारण्याचा प्रयत्न
कल्याण शहरातून शिवाजी चौकमार्गे येणारे, दुर्गाडी किल्ला-गोविंदवाडी वळण रस्ते या कोंडीत अडकले. मेट्रो मॉल दिशा, डोंबिवली ९० फुटी मार्गाने येणारी वाहने या कोंडीत अडकली.
पहाटेची वेळ असल्याने पत्रीपूल भागात वाहनांची वर्दळ कमी होती. अन्यथा पुलर मोटार, दुचाकी किंवा अन्य वाहनावर कोसळला असता तर मोठा अनर्थ घडला असता. पुलर अवजड असल्याने त्या क्षमतेची क्रेन वाहतूक पोलिसांनी मागवून घेतली. सकाळी सात वाजल्यापासून रस्त्यावरील पुलर बाजुला करण्याचे काम सुरू करण्यात आले. सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान पुलर रस्त्यावरून बाजुला करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले. तोपर्यंत पत्रीपुलाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पुलर बाजुला केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले. अंबरनाथ एमआयडीसीतून ओडिसा येथे हा अवजड बाॅयलर अवजड वाहनातून नेला जात आहे. हा बॉयलर कल्याण नाशिकमार्गे नेण्यात येत आहे.