डोंबिवली- डोंबिवली पूर्व भागातील सर्वाधिक वर्दळीच्या चार रस्ता ते दत्तनगर चौक भागात जावळी बँकेच्या जवळील रस्त्यावर भुयारी गटाराचे झाकण तुटले आहे. मागील आठवड्यापासून हे झाकण बदलले जात नसल्याने दररोज या भागात वाहतूक कोंडी होते.सकाळी, दुपारी, संध्याकाळी शाळेच्या बस मुलांची वाहतूक करतात. नोकरदारांना घेऊन जाणाऱ्या, कामाच्या ठिकाणाहून घेऊन येणारी खासगी वाहने शहरात आली की दत्तनगर भागात तुटलेल्या भुयारी गटाराच्या ठिकाणी दररोज वाहन कोंडी होते. मागील आठवड्यापासून हा प्रकार सुरू आहे. तरीही पालिकेकडून हे झाकण काढून घेऊन तेथे नवीन झाकण टाकले जात नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रात्रीच्या वेळेत मुसळधार पाऊस असला तर हे तुटलेले झाकण चालकाच्या लक्षात आले नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे. एकीकडे पालिकेकडून रस्त्यावरील खड्डे, भुयारी गटारावरील झाकणे सुस्थितीत असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र शहरात आहे. पालिका अधिकारी दररोज या वर्दळीच्या रस्त्यावरुन येजा करतात. त्यांना हे तुटलेले झाकण दिसत नाही का, असे प्रश्न नागरिक करत आहेत. गेल्या वर्षी दत्तनगर भागातील अरुंद रस्ते आणि या भागात सतत सुरू असलेल्या गटार, पदपथांच्या कामांमुळे या भागात दोन जणांचा अपघात झाला आहे. त्याच भागात आता गटाराचे झाकण तुटले आहे.

हेही वाचा >>>पिंपरी : ६० लाख खर्च करून मुलीचा धुमधडाक्यात केला विवाह; सासरच्यांनी केला छळ, पती करायचा अनैसर्गिक लैंगिक अत्याचार!

प्रशासनावर आता कोणाचाही वचक राहिला नसल्याने स्थानिक अधिकारी सुस्तावले असल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. अधिकारी वर्ग फक्त बेकायदा बांधकामे, निविदा यामधून दौलतजादा करण्यात व्यस्त असल्याने नागरिकांच्या समस्या सोडविण्यास त्यांना वेळ नाही. त्यामुळे लोकांचे विषय अडगळीत पडत आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी सांगितले.दत्तनगर भागात दररोज कोंडी होत असल्याने अनेक वाहन चालक इतर मार्गाने इच्छित स्थळी निघून जातात. भुयारी गटाराचे व्दार बंद करणे हे पालिकेचे काम आहे. त्यामुळे वाहतूक पोलीसही याठिकाणी काही करू शकत नाहीत. अनेक वेळा डोंबिवलीतील वाहतूक पोलीस स्वताहून खड्डे बुजविण्याची कामे अनेक वेळा करतात. शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दुचाकीवरुन फिरण्याचा देखावा करण्यापेक्षा चारचाकी वाहनातून फिरून शहरातील खड्डे, न भरलेल्या चऱ्या, अंतर्गत रस्त्यांची अवस्था एकदा नजरेतून पहावी, अशी मागणी जाणकार नागरिक करत आहेत.