दुमजली चाळीची १८ मजली टॉवरझेप; शेजारधर्मही कायम
जुन्या ठाणे शहरातील चाळ संस्कृतीची एक ठळक खूण असलेल्या ब्राह्मण सोसायटीतील आनंदाश्रम इमारतीच्या पुनर्विकासाचे काम अखेर सुरू झाले आहे. साठ वर्षांपूर्वी साधारण पाच हजार रुपयांमध्ये मध्यमवर्गीय मराठी माणसांनी आनंदाश्रममध्ये घर घेतले होते. आता पुनर्विकास प्रक्रियेत बांधकाम व्यवसायात मंदीचे ढग असतानाही येथील घरांचे दर प्रतिचौरस फूट २५ ते २७ हजारांच्या घरात असल्याचे बोलले जाते. येथील रेडी रेकनरचा दरच ११ हजार रुपये आहे. जुन्या ठाण्यातील सध्याची पार्किंगची समस्या लक्षात घेता आनंदाश्रममध्ये प्रत्येकी ४० वाहने ठेवता येतील, असे तीन बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहेत.
मध्यंतरीच्या अपार्टमेंट आणि त्यानंतरच्या टॉवर संस्कृतीतही आपला आब आणि रुबाब कायम राखलेल्या आनंदाश्रम चाळीने पुनर्विकासातही आपले हेच वैशिष्टय़ कायम राखले असून या नव्या गृहरचनेतही शेजारधर्म कायम राखला आहे. १९४८ पासून ठाणे शहरातील एक वैशिष्टय़पूर्ण वास्तू असा लौकिक असलेल्या ब्राह्मण सोसायटीतील दुमजली आनंदाश्रममध्ये ६७ खोल्या आहेत. आनंदाश्रमच्या चार हजार चौरस मीटर जागेत दोन टॉवर उभारले जाणार आहेत.
त्यातील चाळकऱ्यांसाठी बांधल्या जाणाऱ्या पहिल्या १८ मजली टॉवरचे काम सुरू झाले आहे. साधारण तीन ते चार वर्षांत या इमारतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतरच चाळ पाडली जाणार आहे. प्रत्येक मजल्यावर चार सदनिका असतील. सर्व चाळकरी एकाच टॉवरमध्ये असल्याने शेजारधर्म कायम राहणार आहे.
केवळ २०० चौरस फूट फुकट
‘चाळकऱ्यांसाठी १८ मजली टॉवर बांधून पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टॉवरचे काम सुरू होईल. दुसरा टॉवर साधारण १४ ते १५ मजली असेल. त्यात निवासी तसेच वाणिज्य वापरासाठी गाळे असतील. चाळतील प्रत्येक रहिवाशाला २०० चौरस फूट बांधकाम विनामूल्य दिले आहे. उर्वरित जागेचे पैसे प्रत्येकाने भरायचे ठरले आहे. पार्किंगची समस्या लक्षात घेता वाहने ठेवण्यासाठी प्रत्येकी ४० गाडय़ा ठेवता येतील, असे तीन बहुमजली वाहनतळ उभारण्यात येतील. चाळीत एक क्लब हाऊस उभारून दिले जाणार आहे, अशी माहिती गौरांग प्रॉपर्टीज लिमिटेडचे दीपक साने यांनी दिली.
सिनेमातली चाळ
चाळ संस्कृतीचे प्रतीक ठरलेल्या आनंदाश्रममध्ये गेली काही वर्षे अनेक चित्रपट तसेच मालिकांचे चित्रीकरण झाले. ठाणे स्थानकालगत असूनही शांत परिसर असल्याने आनंदाश्रममध्ये चित्रीकरण करणे सोयीचे ठरत होते. त्यामुळे सिने-मालिका निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी आनंदाश्रमला पसंती दिली. बीपी, शूटआऊट अॅट वडाळा आदी अनेक चित्रपट तसेच मालिकांचे चित्रीकरण आनंदाश्रममध्ये झाले.
आनंदाश्रम @ २७ हजार रुपये चौरस फूट!
‘चाळकऱ्यांसाठी १८ मजली टॉवर बांधून पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टॉवरचे काम सुरू होईल.
Written by झियाऊद्दीन सय्यद
First published on: 08-12-2015 at 02:57 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Very old anandashrm chawl going for redevelopment in thane